अभिजात संगीताची परंपरा पुढे नेणाऱ्या उदयोन्मुख व गुणी गायक-वादकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हृदयेश आर्टस या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला गानप्रभा संगीतोत्सव यंदा ३० मे ते १ जून या कालावधीत होत आहे. या संगीतोत्सवाचे हे आठवे वर्ष असून विलेपाल्रे पूर्व येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या सभागृहात हा स्वरसोहळा रंगेल.
पं. विद्युत शर्मा यांचे शिष्य मानस कुमार यांच्या व्हायोलीनवादनाने ३० मे या दिवशी या संगीतोत्सवाची सुरुवात होईल. याच सत्रात ऋतुजा लाड (पं. धोंडूताई कुलकर्णी यांची शिष्या) मनीष िपगळे (उस्ताद शाहीद परवेझ यांचे शिष्य) यांचे स्लाइड गिटारवादनही रसिकांना ऐकता येईल.
संगीतोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मे रोजी गंधार देशपांडे (पं. राम देशपांडे यांचे शिष्य व पुत्र) व रमाकांत गायकवाड (पं. सूर्यकांत गायकवाड यांचे शिष्य व पुत्र) यांचे गायन आणि अनुव्रत चॅटर्जी (पं. अिनदो चॅटर्जी यांचे शिष्य व पुत्र) यांचे एकल तबलावादन होणार आहे.
समारोपाच्या दिवशी सायली तळवलकर (पं. पद्मा तळवलकर यांची शिष्या), कृष्णा बोंगाणे (उस्ताद राशिद खान यांचे शिष्य) यांचे गायन व विवेक सोनार (पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य) यांचे बासरीवादन होईल. हे सर्व कार्यक्रम दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता होणार असून ते रसिकांसाठी विनामूल्य आहेत. दिवंगत संगीततज्ज्ञ व रसिकाग्रणी राघवेंद्र बेंगारी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार यंदा संवादिनीवादक ओंकार अग्निहोत्री यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक अविनाश प्रभावळकर यांनी दिली.

Story img Loader