मराठी संगीतातील अमूल्य ठेवा असलेल्या भावसंगीताला/सुगम संगीताला गेल्या एप्रिल महिन्यात नव्वद वर्षे पूर्ण झाली. १९२६ पासून सुरू झालेला मराठी भावगीतांचा हा प्रवास आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. कवी/गीतकार, गायक आणि संगीतकार या सगळ्यांनी मराठी भावसंगीताचे दालन समृद्ध केले आहे. मराठी भावसंगीताचा इतिहास संगीतकार वसंत प्रभू यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भावगीते, भक्तीगीते आणि चित्रपट गीतांवरही प्रभू यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही रसिक श्रोत्यांच्या ओठावर आहेत. येत्या १९ जानेवारी रोजी त्यांची ९३ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने..
भगवान श्रीकृष्णाने ‘ऋतुनाम कुसुमाकर:’ अशा शब्दात भगवद्गीतेमध्ये वसंत ऋतूचे कौतुक केले आहे. मराठी साहित्यातही अनेक लेखक आणि कवींनी वसंत ऋतूचे वेगवेगळ्या शब्दांत वर्णन केले आहे. हर्षांचा, उत्साहाचा आणि संपूर्ण सृष्टीला नवे रूप देणारा ऋतू म्हणून वसंत ऋतूचे विशेष महत्त्व आहे. मराठी संगीतातही संगीतकार वसंत देसाई, वसंत पवार आणि वसंत प्रभू या तीन ‘वसंत’ नावांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. वेगवेगळ्या प्रकारची अजरामर गाणी देऊन संगीतात ‘वसंत’ऋतू निर्माण केला.
या तीनपैकी एक संगीतकार वसंत प्रभू यांचे नाव घेतले की ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला’, ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘चाफा बोलेना’, ‘जेथे सागरा धरणी मिळते’, ‘जन पळभर म्हणतीतल हाय हाय’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘राधा कृष्णावरी भाळली’ ही आणि अशी अनेक अवीट गोडीची गाणी अगदी सहज ओठांवर येतात. संगीतकार वसंत प्रभू, कवी/गीतकार पी. सावळाराम आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या त्रयीने मराठी भाव व चित्रपट संगीताला अवीट गोडीच्या गाण्यांची अमूल्य भेट दिली आहे. मराठी सुगम संगीताप्रमाणेच वसंत प्रभू यांनी चित्रपट संगीतातही आपला ठसा उमटविला. प्रभू यांनी चित्रपटांतील गाणी संगीतबद्ध केली. त्यातील अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. साधी व सोपी आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल हे प्रभू यांच्या गाण्याचे ठळक वैशिष्टय़.
वसंत प्रभू यांनी सुरुवातीला हिंदी चित्रपटात ‘बाल अभिनेता’ म्हणून काम केले. त्यानंतर काही काळ ते नृत्यशिक्षकही होते. वसंत प्रभू यांचे मूळ नाव व्यंकटेश प्रभू. पण हिंदी चित्रपटासाठी हे नाव चालणार नाही म्हणून त्यांचे ‘वसंत’ असे नामकरण करण्यात आले. प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून पाच हिंदी चित्रपटांत काम केले. याविषयी माहिती देताना प्रभू यांचे सहकारी, मित्र आणि ज्येष्ठ संगीतकार बाळ चावरे म्हणाले, १९३८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमाना’ या हिंदी चित्रपटात प्रभू यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन राम दर्यानी यांचे होते. ‘व्यंकटेश’ हे नाव चित्रपटासाठी योग्य ठरणार नाही म्हणून दर्यानी यांनी व्यंकटेशचे नामकरण ‘वसंत’ असे केले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत ‘बाल अभिनेता वसंत’ असे त्यांचे नावही देण्यात आले. ‘जमाना’ या चित्रपटाखेरीज प्रभू यांनी ‘मास्टर मॅन’, ‘राजकुमारी’, ‘देखा जाएगा’, ‘जीवनसाथी’ या हिंदी चित्रपटात काम केले होते.
भार्गवराव पांगे हे प्रभू यांचे गुरू. त्यांच्या मेळ्यामधून ते काम करायला लागले. मेळ्यात ते गाणीही म्हणत असत. ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील एक गाणे २४ वेळा म्हटल्यामुळे (वन्समोअर घेत) त्यांचा आवाज फुटला. त्यामुळे त्यांना गाता येईना. त्यामुळे पांगे यांनी त्यांना मोरे नावाच्या गृहस्थांकडे नृत्य शिकायला पाठविले. नृत्य शिकल्यानंतर काही काळ त्यांनी नृत्यशिक्षक म्हणूनही काम केले. त्या काळात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘अरे पाटलाच्या पोरा जरा जपून’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. प्रभू ज्या मोरे यांच्याकडे नृत्य शिकायला जात होते, त्यांचा मोठा भाऊ कविता करायचा. त्यांनी याच गाण्यासारखे ‘अगं पाटलाच्या पोरी जरा जपून’ हे गाणे लिहिले व त्याला चाल लावायला प्रभू यांना सांगितले. प्रभू यांनी त्याला चालही लावली. ‘एचएमव्ही’ने त्याची ध्वनिमुद्रिका काढली. प्रभू यांची ती पहिली ध्वनिमुद्रिका. ‘पाटलाचा पोर’ हा संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता, असेही चावरे यांनी सांगितले.
प्रभू यांनी काही काळ ‘एचएमव्ही’मध्येही संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी केली. ‘एचएमव्ही’चे वसंतराव कामेरकर यांनी प्रभू यांच्यातील गुणवत्ता आणि प्रतिभा हेरली होती. ‘एचएमव्ही’मध्ये नोकरी करत असतानाच्या काळातही प्रभू यांच्याकडून अनेक उत्तमोत्तम गाणी तयार केली गेली. प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि पी. सावळाराम यांनी लिहिलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने इतिहास निर्माण केला. पुणे रेल्वे स्थानकावर एका नवविवाहित मुलीची सासरी पाठवणी करताना आईच्या डोळ्यांत अश्रू होते. आईने मुलीची ‘सासरी सुखी राहा, डोळ्यात पाणी आणू नको’अशा शब्दांत समजूत काढली. पी. सावळराम हे त्या प्रसंगाचे एक साक्षीदार होते. प्रतिभावान सावळाराम यांनी त्या प्रसंगाला डोळ्यांसमोर ठेवून ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा’ हे गाणे लिहिले. लता मंगेशकर यांच्या आर्त स्वरातील या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक निर्माण केला. त्या काळात तर गाजलेच, पण आजही प्रत्येक मराठी लग्न या गाण्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आचार्य अत्रे यांनी या गाण्याचे कौतुक करताना ‘गंगा जमुना हे गाणे एका पारडय़ात आणि इतर सगळी गाणी दुसऱ्या पारडय़ात टाकली तरीही ‘गंगा जमुना’चे पारडेच जड होईल’ असे म्हटले होते.
प्रभू यांनी सुमारे २५ चित्रपटांना संगीत दिले. भावगीतांप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटांतील गाणीही गाजली. ‘मानसीचा चित्रकार’ हे वसंत प्रभू यांचे चरित्र/आत्मचरित्र प्रसिद्ध असून ते मधू पोतदार यांनी लिहिले आहे.
काही लोकप्रिय.
’ आली हासत पहिली रात
’ कळा ज्या लागल्या जिवा
’ कोकिळ कुहूकुहू बोले
’ घट डोईवर घट कमरेवर
’ जो आवडतो सर्वाना
’ डोळे हे जुलमी गडे
’ मानसीचा चित्रकार तो
’ रघुपती राघव गजरी गजरी
’ राधा कृष्णावरी भाळली
’ राधा गौळण करिते
’ रिमझिम पाऊस पडे सारखा
’ पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता..
’ सप्तपदी हे रोज चालते
’ हरवले ते गवसले का
’ प्रेमा काय देऊ तुला भाग्य दिले तू मला
’ मधु मागसी माझ्या सख्या परी
’ सखी शेजारिणी
वसंत प्रभू यांच्याकडे मी ‘सखी शेजारिणी’ आणि ‘सूरही जुळले, शब्दही जुळले’ ही दोन गाणी गायली. दोन्हीचे कवी/गीतकार वा. रा. कांत होते. ‘सखी शेजारिणी’ हे गाणे ‘शुक्रतारा’ नंतरचे आहे. ‘शुक्रतारा’ला अमाप लोकप्रियता मिळाली. एके दिवशी ‘एचएमव्ही’ कंपनीतून मला दूरध्वनी आला आणि संगीतकार वसंत प्रभू तुम्हाला शोधत आहेत. तुमच्याकडून त्यांना गाणे गाऊन घ्यायचे आहे’ असे मला सांगण्यात आले. प्रभू यांच्याकडे मला गाणे गायची संधी मिळते आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब होती. पण या पद्धतीचे गाणे मी या आधी गायले नव्हते. त्यामुळे थोडी धाकधूक होती. पण ‘शुक्रतारा’ ज्याने गायले आहे, त्याच गायकाकडून मला ‘सखी शेजारिणी’ गाऊन घ्यायचे असल्याचे प्रभू यांचे म्हणणे होते. मी ते गाणे गायले आणि ते लोकप्रिय झाले. आजही श्रोत्यांकडून या गाण्याची फर्माईश होते.
-अरुण दाते