अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 99 वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरमध्ये रंगणार आहे. 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने संमेलन पार पडणार आहे. संमेलनाचं यजमानपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर नागपूरला हा मान मिळाला आहे. प्रेमानंद गज्वी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. संमेलनाची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या यजमानपदाची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. लातूर आणि नागपूर यांच्यात स्पर्धा असल्याने नेमका हा मान कोणाला मिळतोय याची सर्वांनाच उत्सुकता होती. एकही संमेलन न झालेल्या लातूरला हा मान मिळेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र लातूरमधील दुष्काळामुळे नागपूरचं पारडं जड होतं. अखेर नागपूरला हा मान मिळाला आहे.
गतवर्षी मुलुंड येथे नाट्य संमेलन पार पडलं होतं. नाट्य संमेलनात पहिल्यांदाच सलग 60 तास विविध कार्यक्रम सादर करण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. उद्घाटनाला राज ठाकरे आणि शरद पवार उपस्थित होते. तर समारोप कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.