रसिका शिंदे पॉल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका कलाकारासाठी त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस याव्यात याहून मोठा आनंद नाही. ओटीटीवरून जगभरातील लोकांपर्यंत आपले काम पोहोचते आहे. त्यामुळे एकीकडे ओटीटी माध्यमांवरून कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी आणि प्रेक्षकांकडूनही ओटीटीवरच्या आशयाला मिळणारी पसंती वाढते आहे. ओटीटी वाहिनीवर पाहिला जाणारा आशय हा तुम्ही एकांतात पाहात असता; मोठय़ा पडद्यावर एखादा चित्रपट जेव्हा मोठय़ा संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षकांकडून एकत्र पाहिला जातो त्यावेळी चित्रपटाबाबत, कलाकारांच्या अभिनयाबाबत विविध प्रतिक्रिया मिळतात. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचे समाधान अधिक असते.  दुसरीकडे ओटीटी वाहिनीवरील आशय प्रेक्षक आपल्या वेळेनुसार आणि सोयीनुसार केव्हाही पाहू शकतात, त्यामुळे त्यात सोय आणि जगभरातील आशय घरबसल्या पाहण्याची संधी हाही एक वेगळा अनुभव असतो, हे नाकारून चालणार नाही.

– रणदीप हुडा

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत ठरावीक आशयांच्या चित्रपट अथवा मालिकांचा प्रवाह लोकप्रिय ठरतो. सध्या मराठीत एकीकडे ऐतिहासिकपटांची लाट आली आहे, तर दुसरीकडे हिंदीत चरित्रपट वा वास्तव घटनांवर आधारित चित्रपट आणि वेब मालिकांची लाट आली आहे. त्यातही सध्या चरित्र भूमिकांवरून ज्याची चर्चा आहे तो अभिनेता रणदीप हुडा नुकताच ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘इन्सपेक्टर अविनाश’ या वेब मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे.

रणदीप हुडाने ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबमालिकेत अविनाश मिश्रा या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. ही वेब मालिकाही वास्तव घटनांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. २००१ साली ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या रणदीपने ‘डरना जरुरी है’, ‘रिस्क’, ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘जन्नत २’, ‘हिरॉईन’ अशा अनेक चित्रपटांमध्यम्े विविधांगी भूमिका साकारल्या. ‘सरबजीत’ या चरित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षक कधीही विसरू शकणार नाहीत. सरबजीतच्या भूमिकेसाठी रणदीपने शारीरिक मेहनतही तितकीच घेतली होती. सध्या आणखी एका चरित्रात्मक भूमिकेसाठी त्याने चेहरा-शरीराची ठेवण यात केलेले बदल कौतुकाचा विषय ठरले आहे. रणदीप हुडाने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात क्रांतिवीर सावरकरांची भूमिका साकारली आहे. एवढेच नव्हे तर या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. ‘इन्सपेक्टर अविनाश’ या वेबमालिकेच्या निमित्ताने बोलताना चरित्र भूमिका साकारणे ही कलाकारावर खूप मोठी जबाबदारी असल्याचे रणदीपने सांगितले.

‘जिओ सिनेमा’ या ओटीटी वाहिनीने देशातील प्रादेशिक भाषांना आणि तेथील आशयांना प्राधान्य देण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमांतर्गत हिंदी भाषेतील ‘इन्स्पेक्टर अविनाश’ ही वेब मालिका नुकतीच जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या मालिकेतील अविनाश मिश्रा या पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना, या भूमिकेसाठी अविनाश यांची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब मालिकेचे कथानक उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. ‘मुळात ज्यावेळी मी अविनाश यांच्याबद्दल माहिती मिळवत गेलो आणि अभ्यास करत गेलो त्यावेळी मला असे लक्षात आले की एखादी व्यक्ती ज्यावेळी या जगातून निघून जाते त्यावेळी खरे तर त्यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट किंवा मालिका तयार केली जाते. परंतु माझ्या वाटेला अविनाश यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी त्यांच्या हयातीतच मिळाली. त्यामुळे मला त्यांचे जीवन जवळून पाहता, अनुभवता आले. चरित्रपट किंवा मालिका साकारताना त्या व्यक्तीचे जीवन अथवा त्या व्यक्तीचे कार्य हे कोणी लिहून ठेवलेल्या लिखाणामधून अथवा कोणाकडून ऐकून समजते. मात्र, या वेब मालिकेचे वैशिष्टय़च असे होते की इन्स्पेक्टर अविनाश यांनी त्यांच्या कारकीर्दीत गुन्हेगारांशी केलेले दोन हात, त्यांनी केलेल्या कठोर कारवाया या त्यांच्या मुखातून ऐकण्याची संधी मिळाली आणि त्यानुसार माझा या व्यक्तिरेखेबद्दलचा अभ्यास अधिक दृढ होत गेला’, असे त्याने सांगितले. चरित्रपट अथवा मालिका ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, त्या व्यक्तीची  विचारधारा, मानसिक, बौद्धिक क्षमता यांचा सारासार विचार करणे ही एका उत्तम अभिनेत्याची जबाबदारी असते, असेही त्याने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A biographical role is a big responsibility randeep hooda ysh