लोकसत्ता प्रतिनिधी
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा तिहेरी आघाडय़ांवर यशस्वी ठरलेल्या महेश मांजरेकर यांचा ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट येत्या १ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या चित्रपटांनंतर महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक आगळी वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. वडिलांच्या इच्छेखातर मनाविरुद्ध लग्न केलेल्या आणि पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या आठवणींमध्ये गुंतलेल्या आजच्या काळातील तरुणीची आणि नात्यांना प्राधान्य देणाऱ्या नव्वदच्या दशकातील विचारसरणी जपणाऱ्या जबाबदार तरुणाची ही कथा आहे, असे महेश मांजरेकर यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयातील भेटीदरम्यान झालेल्या गप्पांमध्ये स्पष्ट केले. या चित्रपटात श्रेयस तळपदे, गौरी इंगवले, सुहास जोशी, शरद पोंक्षे, ऋषी सक्सेना, दीप्ती लेले आदी उत्तम नवे-जुने कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाबद्दल सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, ‘दिग्गज दिग्दर्शक राज कपूर यांना त्यांच्या जुन्या चित्रपटातील गाण्यांमधून नवीन चित्रपटांसाठी नवीन संकल्पना किंवा त्यावरून नवीन गाणी सुचायची. मला स्वत:ला माझ्या ‘पांघरूण’ चित्रपटातील ‘ही अनोखी गाठ’ हे गाणं फार आवडतं. त्यामुळे या चित्रपटाची कथा लिहून झाली तेव्हा या गाण्यांच्या ओळीवरूनच ‘ही अनोखी गाठ’ हे नाव पटकन सुचलं. आणि खरोखरच या दोघांच्या नात्याची ही गाठ फार अनोख्या पद्धतीनेच चित्रपटात जोडली गेली आहे. तेव्हा राज कपूर यांचा आदर्श घेऊन हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला’. प्रेमपटांची मांडणी करताना आजच्या काळातील बदललेली नाती आणि त्यांची पद्धतही लक्षात घ्यावी लागते असं त्यांनी सांगितलं. ‘हल्ली नात्यांमधून प्रेमाची गरज ही सगळय़ात कमी महत्त्वाची ठरू लागली आहे. कुठलंही नातं स्वीकारताना त्यातून माझ्या गरजा आधी पूर्ण होतील का? याचा विचार अधिक केला जातो. नि:स्वार्थ प्रेम ही भावना आता उरलेलीच नाही असं वाटू लागलं आहे. या सगळय़ा नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा >>>Video: लग्न मंडपातील प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकरच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
या चित्रपटातून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री गौरी इंगवले अशी वेगळीच जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याबद्दल बोलताना नायिकेसाठी गौरीचीच निवड पक्की झाली होती, असं त्यांनी सांगितलं. ‘गौरीमध्ये साताऱ्याचा साधेपणा अजूनही तसाच आहे. तसंच शहराच्या रोषणाईमध्ये हरवलेलं असं तिचं व्यक्तिमत्त्व नाही. मला या पात्रासाठी अशीच मुलगी हवी होती जिला शहराविषयी आकर्षण असेल. तसंच तिचा नवरा हा काहीसा नव्वदच्या दशकातला आहे. त्याची विचारसरणी ही त्या काळातील लोकांप्रमाणे नात्यांना जपणारी अशी आहे. या पात्रासाठी श्रेयस हा उत्तम निवड आहे असं मला वाटलं आणि त्याला ही गोष्ट सांगितली. त्यानेही लगेच हा चित्रपट करण्यासाठी होकार कळवला. त्याच्या पुढच्या दहा दिवसांत महाबळेश्वरला या चित्रपटाचं चित्रीकरण करायचं ठरलं आणि आता तो प्रेक्षकांसमोर येतो आहे’, असं मांजरेकर यांनी सांगितलं.
मराठी-हिंदी दोन्हीकडे उत्तम चित्रपट महेश मांजरेकर यांनी दिले आहेत. आणि आताही अनेक तरुण मराठी दिग्दर्शक, कलाकार मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांचंही आव्हान पेलताना दिसतात. या अनुषंगाने बोलताना मुळात चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं, असं स्पष्ट मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं. त्यांच्या मते, हा जो काही भाषेचा न्यूनगंड आहे ना तो मराठी लोकांमध्ये उगाचच असतो. ‘काकस्पर्श’ हा चित्रपट हिंदी भाषेत होऊ शकला नसता. हा चित्रपट मला मराठी भाषेत करता आला याचा मला अभिमान आहे. ‘काकस्पर्श’, ‘पांघरूण’ अशा चित्रपटांमधून आपली संस्कृती दिसून येते. आता अमूक चित्रपट हिंदीत का केला नाही मराठीत का केला? हे प्रश्न मराठी माणसाकडूनच विचारले जातात. त्यामुळे हा न्यूनगंड आपल्याच भाषिक लोकांकडून येतो, असं ते म्हणतात. तमिळ आणि तेलुगू चित्रपटाचं कौतुक याचसाठी केलं जातं, कारण मुळात तिथल्या लोकांना आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. मराठी चित्रपटसृष्टीने आजवर उत्तम आशयाचे चित्रपट दिले आहेत. एक काळ मराठी चित्रपटसृष्टीने गाजवलेला आहे. भारतात चित्रपट आणणारा दादासाहेब फाळके हा मराठी माणूस होता, एवढं सगळं असताना मराठी भाषेत चित्रपट का केला? हा संकोच कशाला? असा सवाल उपस्थित करतानाच आता येणारी नवीन पिढी हा भाषेचा अभिमान आणखी वाढवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>>सोनाली कुलकर्णीचा नवरा करतो ‘हे’ काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…
नकळत तुलना होत राहते..
हातात मोबाइल असल्यामुळे जगभरातले चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नकळतच अमूक एक चित्रपट तमूकसारखा वाटतो, अशी मतं तयार होत राहतात. तुलना होत राहते, पण प्रत्येक चित्रपट वेगळाच असतो, असं मांजरेकर यांनी सांगितलं. ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’सारखा असल्याच्या चर्चाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. ‘प्रत्येक कथा ही सारखी नसते. मी ‘हम दिल दे चुके सनम’सारखाच चित्रपट परत मराठीत का करू? आता ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट ‘वो सात दिन’सारखा होता असं कोणी म्हणतं का ? ‘वो सात दिन’ हा चित्रपट ‘घरंदाज’सारखा होता असं कोणी म्हणतं का? नाही ना.. प्रत्येक चित्रपटाची कथा वेगळी असते. चित्रपटाची कथा कशी असणार आहे, हा दिग्दर्शकाचा निर्णय असतो. त्यामुळे खूप चित्रपट पाहिल्यानंतर आपली मतं तयार होत असली तरी नवीन आलेल्या चित्रपटाविषयी कुठलंही मत तयार करण्याआधी तो पाहायला हवा, असं आग्रही मत त्यांनी व्यक्त केलं.
निर्मितीखर्चाचं गणित वगळता उत्साह दोन्हीकडे सारखाच – श्रेयस तळपदे
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय, दिग्दर्शनाबरोबरच रंगभूमीसाठी ओटीटी या नव्या माध्यमातून केलेले प्रयोग, मालिकेतून मुख्य भूमिका असं सातत्याने वैविध्यपूर्ण काम श्रेयस करतो आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये नेमका काय फरक आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना दोन्हीकडे निर्मितीखर्चातील तफावत हीच वेगळेपणा असलेली गोष्ट असल्याचं त्याने सांगितलं. मराठी चित्रपटांची बाजारपेठ ही मुख्यत: महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे, त्यामुळे साहजिकच निर्मितीखर्च कमी केला जातो. हिंदीची बाजारपेठच मोठी असल्याने साहजिकच देशभरातील चित्रीकरण, तंत्रज्ञ, कलाकार असा निर्मितीखर्चाचा अवाका वाढता असतो. बाकी आशय, विषय, कलाकार आणि कामाचा उत्साह हा दोन्हीकडे सारखाच असतो, असं त्याने सांगितलं. ‘मला जे काम मनापासून आवडतं तेच मी करतो. मग ती मालिका असो किंवा हिंदी – मराठी चित्रपट असो. हल्ली युटय़ूबवर देखील उत्तम विषय पाहायला मिळतात. भविष्यात मला युटय़ूबवरील एखाद्या उत्तम आशय असलेल्या मालिकांसाठी विचारलं तर तेही मी आवडीने करेन’, असं श्रेयसने सांगितलं.
चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं. हा जो काही भाषेचा न्यूनगंड आहे ना तो मराठी लोकांमध्ये उगाचच असतो. आता अमूक चित्रपट हिंदीत का केला नाही मराठीत का केला? हे प्रश्न मराठी माणसाकडूनच विचारले जातात. भारतात चित्रपट आणणारा दादासाहेब फाळके हा मराठी माणूस होता. एवढं सगळं असताना मराठी भाषेत चित्रपट का केला? हा संकोच कशाला? –महेश मांजरेकर