मराठी रंगभूमीवर कौटुंबिक नातेसंबंध व सामाजिक विषयांवरील नाटकांचंच प्राबल्य नेहमी राहिलेलं आहे. यापल्याडचं विश्व अपवादानंच रंगमंचीय अवकाशात अवतरताना दिसतं. भव्य कॅनव्हासच्या विषयांचं
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वात दोस्तराष्ट्रांनी हिटलरची चहूबाजूंनी कोंडी केलेली होती. आपला दारुण पराभव आता अटळ आहे, हे वास्तव त्याच्यासमोर आ वासून ठाकलं होतं. अशा निर्वाणीच्या आणीबाणीच्या काळात बर्लिनमधील एका अभेद्य बंकरमध्ये त्यानं आश्रय घेतला होता. सगळीकडून जर्मन सैन्याच्या पराभवाच्या वार्ता कानावर येत होत्या. त्या बातम्यांनी हळूहळू त्याचं मानसिक संतुलनही ढळत चाललं होतं. त्याचे विश्वासू सहकारी त्याला, जर्मनीला उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी शरणागतीचं पांढरं निशाण फडकवावं, असा सल्ला देत होते. परंतु जर्मनीच्या.. त्यातही आर्य वांशिकश्रेष्ठत्वाच्या दुरभिमानामुळे हिटलरला ते कदापि मान्य नव्हतं. भले आत्मघात करून आपलं अस्तित्व संपवेन; परंतु शत्रूला काही झालं तरी शरण जाणार नाही, ही त्याची भूमिका होती. त्यादृष्टीनं त्यानं निरवानिरवही सुरू केली होती. आपल्या पश्चात जर्मनीचं नेतृत्व कुणी करावं, तसंच आपल्या व्यक्तिगत मालमत्तेचं काय करावं, याबद्दलची तजवीज असलेली दोन वेगवेगळी मृत्यूपत्रंही त्यानं तयार करून घेतली होती. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी आपली दीर्घकाळची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिला दिलेल्या लग्नाच्या वचनानुसार तिच्याशी या अशा कठीण समयातही लग्नाचा निर्णय त्यानं घेतला होता. त्याचबरोबर आपल्या मृत्यूनंतर आपलं नखही शत्रूच्या हाती सापडू नये म्हणून आपलं पार्थिव जाळून टाकावं असं त्यानं आपल्या सहकाऱ्यांना बजावलं होतं. हिटलरच्या आयुष्यातील हा शेवटचा टप्पा चित्रित करणारं हे नाटक.. ‘द डेथ ऑफ कॉन्करर’!
लेखक डॉ. समीर मोने यांनी हिटलरचे शेवटचे दिवस नाटकात चितारताना त्याचं उदात्तीकरण करायचं कटाक्षानं टाळलं आहे. त्याऐवजी एक व्यक्ती म्हणून त्याच्या पतनाचा आलेख त्याच्या मानसिक-भावनिक आंदोलनांसह रेखाटायचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या उद्रेकी मनोव्यापाराचा धागा त्यांनी नाटकात गुंफला आहे. अशी व्यक्ती एखाद्या राष्ट्राचं नेतृत्व करीत असेल तर त्या राष्ट्राचं भवितव्य अंध:कारमयच असणार, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. त्यामुळे हुकूमशहा हिटलरला प्रेक्षकांची सहानुभूती न मिळता योग्य त्या उपचारांअभावी प्रवाहपतित झालेली एक मनोविकृत व्यक्ती म्हणून हिटलरला किंचितशी सहानुभूती मिळते, तितपतच. हिटलरचं स्वत:चं म्हणून एक सूडाचं तत्त्वज्ञान होतं आणि तो ते ठासून मांडताना दिसतो. परंतु या तत्त्वज्ञानाच्या संभाव्य परिणामांचा तो यत्किंचितही विचार करीत नाही. म्हणूनच जर्मन अस्मितेच्या आणि वंशश्रेष्ठत्वाच्या मुद्दय़ांपुढे जर्मनीच्या भविष्यातील ऱ्हासाचं चित्र तो कल्पूही शकत नाही. याचा व्हायचा तो परिणाम होतो.. ज्यूंचा प्रलयकारी नरसंहार आणि जर्मनीचं सर्वार्थानं पतन! ज्या जर्मनीची मान जगात उंचवावी म्हणून त्यानं सबंध जगालाच महायुद्धाच्या वेठीस धरलं होतं, तो त्याचा देशच त्याच्या या करणीनं उद्ध्वस्त झाल्याचं क्लेशकारक वास्तव त्याला पाहावं लागतं. पहिल्या महायुद्धात व्हर्सायच्या तहात जी मानहानी जर्मनीच्या वाटय़ाला आली, तीच पुन्हा हिटलरच्या या युद्धज्वरानं जर्मनीच्या नशिबी आली. शिवाय, देशाचे तुकडे झाले ते वेगळेच. पण हिटलरला याची तमा नव्हती. आपण जरी जर्मनीला तिचा आत्मसन्मान मिळवून देण्यात अपयशी ठरलो, तरी पुन्हा एखादा नवा हिटलर जन्माला येईल आणि जर्मन अस्मितेचा ध्वज आकाशात डौलानं फडकवेल असं त्याला शेवटपर्यंत वाटत होतं. म्हणूनच कोवळ्या जर्मन मुलांना शत्रूराष्ट्रांविरुद्ध युद्धात उतरवण्यापर्यंत त्याची मजल गेली. हिटलरच्या मनोविकृत अध:पतनाचा हा प्रवास लेखकानं तटस्थतेनं नाटकात मांडला आहे. भस्मासुराच्या पाशवी कृत्यांना प्रारंभी यश मिळाल्यावर तो जसा चेकाळून उन्मत्त होतो, तेच हिटलरच्या बाबतीत घडलं. त्याच्या विकृतीपायी सबंध जग, लाखो ज्यू आणि खुद्द जर्मनीही सर्वस्वानं होरपळून निघाली. त्याच्या निकवर्तीयांपैकी कुणी याची जाणीव सारी हिंमत एकवटून हिटलरला करून दिलीही असेल कदाचित; परंतु उन्मादाला रोखणं अशक्य असतं. तेच हिटलरच्या बाबतीत घडलं. हिटलरचे शेवटचे दिवस नाटकातून तटस्थपणे मांडताना लेखकानं कळत-नकळत ब्रेख्तियन तंत्राचा अवलंब केला आहे; ज्यामुळे प्रेक्षक नाटकात मनानं गुंतत नाही. तो काठावरच राहतो. परंतु त्याचमुळे नाटक त्याला भिडतही नाही.
दिग्दर्शक अजित भगत यांनीही हाच धागा पकडला आहे : हिटलरचं उदात्तीकरण करणे नाही! अर्थात ते योग्यच आहे. परंतु याचा अर्थ असा नाही, की नाटकानंही प्रेक्षकाला गुंतवू नये. समोर जे घडतं त्याचे प्रेक्षक निव्वळ साक्षीदार होतात. परंतु त्यातल्या भयावहतेच्या दर्शनानं ते आतून हलत नाहीत. असं का व्हावं? याचाच अर्थ प्रयोगाच्या सादरीकरणात काहीतरी गडबड झालेली आहे. यात अडकलेली माणसंही हाडामांसाचीच आहेत. फक्त हिटलरसारख्या युद्धपिपासू व्यक्तीशी ती संबंधित आहेत. त्याच्या भल्याबुऱ्या कृत्यांशी बांधलेली आहेत. एका प्रचंड उलथापालथीच्या कालखंडाची कर्तीकरविती आहेत. त्यांचं हे ‘कार्य’ या नाटकात अस्पर्शित राहिल्यानंच असं घडलं असेल का? हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन आणि त्याच्यातलं नातंही नाटकात नीटसं उलगडत नाही. त्याच्यासारख्या विकृत व्यक्तीच्या प्रेमात तिनं आकंठ बुडावं.. इतकं, की त्याच्या मृत्यूतही तिनं त्याला सोबत करावी! याचा अर्थ उभयतांची परस्परांत उत्कट गुंतणूक होती. परंतु नाटकात ती कुठंच प्रत्ययाला येत नाही. हिटलरवर सर्व झोत टाकण्याच्या नादात याकडे लेखकाचं दुर्लक्ष झालं असावं. एक खरंय, की नैराश्यग्रस्त हिटलरच्या उत्स्फूर्त, पण अविचारी क्रिया-प्रतिक्रियांतून त्याची शोकांतिका अटळ होते. या प्रक्रियेतलं शोकसंतप्त नाटय़ मात्र ज्या तीव्रतेनं नाटकात प्रतिबिंबित व्हायला हवं होतं, तसं ते होत नाही. म्हणूनही प्रेक्षकांचं त्याच्याशी नातं जुळत नाही. दिग्दर्शकानं संहितेबरहुकूम नाटकाचा प्रयोग सुविहित रचला आहे. पंढरीदादा जूकर यांच्या रंगभूषेनं आणि यथार्थवादी वेशभूषेनं नाटकाला विशिष्टकालीन अस्सलता प्राप्त झाली आहे. प्रदीप पाटलांनी उभारलेल्या बंकरच्या आगळ्या नेपथ्यानं आणि भूषण देसाईंच्या गूढ-गहन वातावरणनिर्मिती करणाऱ्या प्रकाशयोजनेनं नाटकात आवश्यक ते पर्यावरण उपलब्ध करून दिलं आहे. पाश्र्वसंगीतकारांनीही आपली कामगिरी वट्ट वठविली आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या पर्वात प्रचंड धास्तावलेला, दारुण पराभव समोर ठाकल्यानं नैराश्यानं पछाडलेला, भ्रमित झालेला; परंतु तरीही वंशश्रेष्ठत्वाची अनावर ऊर्मी आणि जर्मन अस्मितेचा जाज्ज्वल्य दुरभिमान बाळगणारा हिटलर सुशील इनामदार यांनी मोठय़ा ताकदीनं उभा केला आहे. विकृतीचं टोक गाठलेला, पण त्याची जाणीव नसलेला हिटलर त्याच्या शारीर तसेच मानसिक अभिनिवेशासह त्यांनी जोरकसपणे साकारला आहे. हिटलरची भावनिक-मानसिक आंदोलनं त्यांनी आपल्या देहबोलीतून प्रत्ययकारी केली आहेत. इव्हा ब्राऊनच्या भूमिकेतील देवश्री साने यांनी तिला बार्बी डॉलच्या रूपात का पेश केलं, कळायला मार्ग नाही. बहुधा त्यांचं भारतीयपण लपविण्याच्या खटाटोपात हे घडलं असावं. अतुल अभ्यंकरांनी हिटलरचा एकनिष्ठ सहकारी व प्रचारप्रमुख जोसेफ गोबेल्स रंगवला आहे. त्याचं ऐतिहासिक पाताळयंत्रीपण मात्र यात प्रत्ययाला येत नाही. तो हिटलरचा एकनिष्ठ मित्र व हितचिंतकच अधिक जाणवतो. नंदू सावंत यांनी नाझी सेनानी जनरल कायटेलच्या भूमिकेला मानवीयता बहाल केली आहे. अर्न्स्ट रोएमच्या रूपातील अरुण पालव यांनी हिटलरचा अपराधगंड वा त्याचा आंतरिक छळ करणारं अंतर्मन म्हणा, किंवा शिरकाण झालेल्या लाखो ज्यूंचा आत्मा म्हणा; या रूपात हिटलरला सदोदित भयकंपित करण्याचं काम उत्तम पार पाडलं आहे. मृणाल वरणकर (ट्रॉडल), गौतम बेर्डे (लष्करी अधिकारी मार्टिन बोरमन), महेश वरवडेकर (डॉ. व्ॉगनैर व रजिस्ट्रार) आणि आनंद गायकर (लिटिल सोल्जर) यांनीही आपल्या भूमिका चोख वठवल्या आहेत.
एका वेगळ्या विषयावरचा नाटय़प्रयत्न म्हणून ‘डेथ ऑफ अ कॉन्करर’ एकदा पाहायला हरकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा