बॉलीवूड चित्रपट ‘तद्दन’ या शब्दाने बऱ्याचदा सुरू होतात आणि संपतात. कथानक कोणतेही असले तरी स्टार कलावंत आणि त्यातही नायककेंद्री चित्रपट असतो तेव्हा त्याच्या चाहत्यांना आवडतील अशी सगळी मांडणी, त्या जोडीला गाणी, मारधाड असा सगळा मसाला असतो. परंतु, एक बेताची यशस्वी नायिका रुपेरी पडद्यावर निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर चित्रपट घेऊन येते तेव्हा त्याचे नावा ‘ढिश्क्याँव’ असे असले तरी किमान करमणूक अपेक्षित असते. परंतु, किमान करमणूक तर सोडाच, मुळात गोष्टीतील गोंधळ पटकथा आणि मांडणीतही कायम ठेवणारा हा चित्रपट पाहताना प्रेक्षकाच्या डोक्याचा भुगा झाल्याशिवाय राहात नाही. 

सनी देओल चित्रपटात असूनही त्याची हुकमी हाणामारी, ‘ढाई किलो का हाथ’ याचा पुरेपूर वापर करणे शक्य असूनही दिग्दर्शकाने फक्त विकी काडतूस अशी व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हरमन बावेजाला अधिक दाखविण्यावर भर ठेवला आहे. हरमन बावेजाने प्रमुख भूमिका साकारत रूपेरी पडद्यावर पुनरागमन केले आणि तो नायक असला तरी त्याच्या पूर्वीच्या चित्रपटांपेक्षा अधिक चांगला अभिनय तर राहूच देत, परंतु प्रमुख व्यक्तिरेखा असूनही प्रेक्षकावर छाप पाडण्यात तो पुरता अयशस्वी ठरला आहे.
विकी काडतूस हा आईविना लहानाचा मोठा झालेला मुलगा वडिलांचे प्रेम न मिळाल्यामुळे एकलकोंडा होतो. सतत अवहेलना सोसावी लागल्याने कळत्या वयातच तो ‘गँगस्टर’ बनण्याचे ठरवितो. त्याला टोनीच्या रूपाने ‘गुरू’ भेटतो. अखंड सिनेमाभर कोणतातरी ‘हौवा’ म्हणजे आपला स्वत:चा हिसका गँगस्टर जगताला दाखविण्याची वायफळ इच्छा बाळगत विकी काडतूस अधिक मोठा गँगस्टर बनण्याचे ठरवितो. चित्रपटाच्या सुरुवातीपासून तो तुरुंगात आपल्याला असे बनायचे आहे, खलिफा नावाच्या गँगस्टरला इंगा दाखवून त्याचे पद पटकावायचे आहे असे सनी देओल म्हणजेच एका हरियाणवी दादाला सांगतोय असे दाखविले आहे. गुंडांच्या बरोबर राहत असताना आणि सतत काही झाले की ‘ढिश्क्याँव’ करण्याची भयंकर दांडगी हौस दाखवीत नायक विकी काडतूस आणि रॉकी हा त्याचा सहगुंड वगैरे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असे करत करत चित्रपट पुढे सरकतो. त्यातच विकी काडतूस एका पबमध्ये जातो आणि एका य:कश्चित तरुणीच्या प्रेमात काय पडतो, मग गाणी वगैरे येतात. मी एक गँगस्टर आहे असे सांगितल्यावरही ती तरुणी विकीच्या प्रेमात काय पडते वगैरे असंबद्ध गोष्टींचा भरणा दिग्दर्शक करत राहतो. अंडरवर्ल्ड आणि टोळ्यांमधले वैर या विषयावर आतापर्यंत बॉलीवूडमध्ये झळकलेल्या चित्रपटांपैकी सगळ्यात वाईट गँगस्टरपट असे या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल. एकही व्यक्तिरेखा, अनेक संवाद याबाबत प्रेक्षक गोंधळात पडतो. त्याच जोडीला रटाळ संगीत, भयंकर गाणी याची भर पडल्यामुळे प्रेक्षकाच्या डोक्याचा भुगा होतो.

ढिश्क्याँव
निर्माते – सुनील लुल्ला, शिल्पा शेट्टी
दिग्दर्शक – सनमजित सिंग तलवार
संगीत – पलाश पांचाल
कलावंत – हरमन बावेजा, सनी देओल, आयेशा खन्ना, प्रशांत नारायण, आनंद तिवारी, आदित्य पांचोली, सुमीत निझावन, हसन झैदी, रजित कपूर.