साहित्यावर आधारित सिनेमा हा विषय नेहमीच चर्चेचा, वादाचा ठरतो अशी अनेक उदाहरणे आहेत. कथा, लघुकथा अथवा जीवनचरित्रावर आधारित चित्रपट करणे हेच मुळात आव्हानात्मक ठरते. साहित्यकृतीवर आधारित चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य उचलणे हीच कौतुकास्पद बाब ठरते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘दृष्टिदान’ कथेवर बेतलेल्या ‘तप्तपदी’ या चित्रपटाच्या बाबतीत निर्माते-दिग्दर्शक नवोदित असूनही त्यांनी हे शिवधनुष्य उचलले याबद्दल कौतुक केले पाहिजे. परंतु, चित्रपटाचा पहिलाच अनुभव असल्यामुळे कदाचित चित्रपट मांडणीच्या बाबतीत अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. वीणा जामकरचा अभिनय हीच या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू ठरली आहे. 

गुरुदेव टागोर यांची कथा, त्यातील वातावरण, कथानक तंतोतंत पडद्यावर मांडण्याचा काटेकोर प्रयत्न करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. आईविना आत्याकडे वाढलेली मीरा ही चिमुरडी माधव या आत्येभावासोबत लहानाची मोठी होते. नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्न करतात. १९३०-४० सालादरम्यान घडणारी ही गोष्ट. त्या काळात सधन मराठी कुटुंबातील माधव वैद्यकीय शिक्षण घेतोय. लग्नानंतर माधव-मीरा यांचा संसार सुरळीत सुरू असतानाच अचानकपणे एका विशिष्ट आजाराने मीराचे डोळे जातात. मग त्यांच्या नात्यात निर्माण झालेला दुरावा, दोघांच्या संसारात तिसऱ्या मुलीचे येणे, पुनर्विवाहाचा घाट घालण्याचा प्रयत्न, त्यातून होणारे समज-गैरसमज, पती-पत्नी नात्यांतील तणाव असा सगळा नाजूक विषय दिग्दर्शकाने पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, या सगळ्यातील नाटय़ पकडण्यात चित्रपट अपयशी ठरतो.
मीरा ही प्रमुख व्यक्तिरेखा, तिची भावनिक आंदोलने, दृष्टी अधू झाल्यानंतरचा अभिनय असो की सबंध चित्रपटातील वावर या सगळ्या बाबतीत वीणा जामकरने अप्रतिम अभिनय केला आहे. कश्यप परुळेकरने टीव्हीचा पडदा गाजविला आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट असून त्याने साकारलेला माधव त्याच्या परीने परिपूर्ण साकारण्याचा प्रयत्न पडद्यावर दिसतो. परंतु, रुपेरी पडद्यावरील अभिनय अद्याप त्याला गवसायचा आहे हेही जाणवते. श्रुती मराठेने साकारलेली सुनंदा चित्रपटातील तिच्या वयापेक्षा अधिक प्रगल्भ दिसते, त्यामुळे काही प्रसंगांमध्ये ही व्यक्तिरेखा पटत नाही. त्यात वेशभूषाकारांनी तिला डिझायनर साडय़ा परिधान करायला लावल्या आहेत. त्यामुळेही तिची व्यक्तिरेखा खटकते.
जुन्या काळातील सधन मराठी कुटुंबातील वातावरण, तेव्हाच्या काळातील दागदागिन्यांनी, भरजरी शालू नेसून नटलेल्या महिलांचे रूपडे दाखविण्याचा प्रयत्न आणि त्याला तंत्रज्ञांची मिळालेली चांगली साथ यामुळे चित्रपट चकचकीत दिसतो. हीसुद्धा एखाद्या जुना काळ दाखविण्याऱ्या चित्रपटाची जमेची बाजू ठरू शकते. परंतु, हा अतिचकचकीतपणा टाळून मीरा-माधव यांच्या नात्यातील ताणेबाणे, त्यातले नाटय़ यावर भर दिला असता तरी चित्रपट वेगळ्या उंचीवर नेल्याचा अनुभव प्रेक्षकाला मिळू शकला असता.
जुन्या काळातील तरुण पती-पत्नीचे नाते कसे होते, त्या पाश्र्वभूमीवर डॉक्टर असलेला तरुण नवरा आपल्या बायकोशी कसा वागू शकला असता हे चित्रपटातून काही अंशी दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटकर्त्यांचा दिसतो. जोडीदार गंभीर आजारी पडल्यानंतर तरुण पती-पत्नीच्या नात्यामधील भावनिक पदर उलगडून दाखविण्यात चित्रपट कमी पडतो. नीना कुलकर्णी यांनी साकारलेली आत्या ही भूमिकाही किंचित भाव खाऊन जाते. वीणा जामकरचा अभिनय हेच या चित्रपटाचे बलस्थान ठरते.

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका

तप्तपदी
निर्माते – सचिन नागरगोजे, हेमंत भावसार
पटकथा व दिग्दर्शन – सचिन नागरगोजे
संवाद – मधुगंधा कुलकर्णी
मूळ कथा – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
छायालेखन – संतोष सुवर्णकार
संकलन – संजीव गिल
संगीत – सुमीत बेल्लारी, रोहित नागभिडे
गीते – वैभव जोशी
कलावंत – वीणा जामकर, कश्यप परुळेकर, श्रुती मराठे, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, अंबरीश देशपांडे, राहुल वैद्य, नेहा बाम, बालकलाकार मधुरा नावडे, वेदांत कुलकर्णी, प्रेम कुलकर्णी.

Story img Loader