एक उत्तम अभिनेता म्हणून सातत्याने प्रकाशझोतात असलेला, लोकांच्या कौतुकाचा विषय ठरलेला अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी गेले दोन वर्षे अपयशाची चव चाखतो आहे. त्याचे चित्रपट चालले नाहीत, शिवाय वैयक्तिक आयुष्यातील वादविवादही पिच्छा सोडत नसल्याने काहीसा बाजूला पडलेला नवाझ आता पुन्हा एकदा ‘हड्डी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘झी ५’ वर ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने बोलताना गेल्या काही वर्षांत भूमिकांच्या बाबतीत आपण केलेले प्रयोग फसले त्यामुळेच अपयश वाटय़ाला आले असल्याची कबुली नवाझुद्दीनने दिली.

अक्षत शर्मा दिग्दर्शित ‘हड्डी’ या चित्रपटात नवाझुद्दीनने तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एकंदरीतच या चित्रपटात असणारे कलाकार, गुंतागुंतीची कथा आणि नवाझुद्दीनचा लुक यामुळे ‘हड्डी’विषयी प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. ‘अफवाह’नंतर नवाझुद्दीन पुन्हा एकदा दमदार भूमिकेत पाहायला मिळणार अशी आशा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. याची जाणीव असलेल्या नवाझुद्दीनने मधल्या काळात आपण केलेल्या काही चित्रपटांची निवड चुकली असल्याचे म्हटले आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
neelam shirke opens about healthy competition with aditi sarangdhar
“आमच्यात टक्कर नक्कीच होती, पण…”, अदिती सारंगधरबद्दल नीलम शिर्के काय म्हणाली? सांगितला ‘असंभव’ मालिकेचा किस्सा
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना

नेहमी तडकभडक आणि पठडीबाज नायकांपेक्षा हटके व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नवाझुद्दीनने ‘टिकू वेड्स शेरू’ या प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात आणि ‘जोगीरा सारा रा रा’ या दोन्ही चित्रपटांत प्रेमी आणि विनोदी नायकाच्या भूमिका केल्या होत्या. मात्र या दोन्ही चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘हिरोपंती २’ या व्यावसायिक चित्रपटातील त्याची भूमिकाही फारशी लोकांच्या पसंतीस उतरली नाही. त्यातल्या त्यात मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘अफवाह’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक झाले. आता प्रेक्षकांचा तसाच प्रतिसाद ‘हड्डी’ चित्रपटालाही मिळेल असा विश्वास त्याला वाटतो आहे. ‘मला वेगवेगळय़ा शैलीतील चित्रपट करून पाहायचे आहेत. विनोदी ढंगाच्या प्रेमपटातून नायकाची भूमिका करायचीही इच्छा आहे’ असे त्याने सांगितले. त्यामागचे कारण स्पष्ट करताना, ‘मी काही खूप गंभीर व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. रामन राघव, मंटो, ‘सेक्रेड गेम्स’मधला गणेश गायतोंडे या खूप उत्कट आणि कलाकार म्हणून तुमची कसोटी पाहणाऱ्या अशा व्यक्तिरेखा मी साकारल्या आहेत. या भूमिका केल्यानंतर काहीतरी हलकेफुलके, निखळ मनोरंजक असे काहीतरी करून पाहणे ही माझी गरज होती. या अशा सशक्त भूमिका दीर्घकाळ तुमच्या मनातून जात नाहीत. त्या त्या भूमिकांमधील काही गोष्टी तुमच्यात राहतात, त्यातून आपण माणूस म्हणून चटकन बाहेर पडत नाही. या भूमिकांचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यातल्या त्यात हलकीफुलकी भूमिका करणे गरजेचे वाटत होते’ असे त्याने सांगितले. आणि म्हणूनच मधल्या काळात त्याने काही प्रेमपटांची निवड केली होती. मात्र त्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा एकदा आपल्या चित्रपट निवडीबाबत फेरविचार करण्याचे धोरण नवाझुद्दीनने स्वीकारलेले दिसते.

काही चित्रपटांच्या बाबतीत गोष्टी ठरवल्या होत्या तशा तंतोतंत यशस्वी झाल्या नाहीत हे तो मान्य करत असला तरी यापुढे असे प्रयोग करायचेच नाहीत असेही त्याचे म्हणणे नाही. उलट कलाकार म्हणून तो वेगवेगळे प्रयोग करून पाहतो आहे यात आनंद वाटत असल्याचेही त्याने सांगितले. ‘आता अभिनेता म्हणून जो संघर्ष सुरू आहे तो मजेशीर आहे. मला नेहमीच नवीन नवीन गोष्टी करून पाहायच्या होत्या. नेहमीपेक्षा भिन्न शैली-प्रकृती असलेले काही करायचे होते आणि आता मी तेच सगळे करून पाहतो आहे. मला कधीच एका पठडीतील भूमिकांमध्ये वा चित्रपटांमध्ये अडकून पडायचे नाही. सध्या मी विनोदी चित्रपटही करतो आहे, महोत्सवात चालेल असा चित्रपटही करतो आहे आणि तद्दन व्यावसायिक चित्रपटही करतो आहे. हा संघर्ष मला अनुभवसमृद्ध करणारा आहे, असे नवाझुद्दीनने सांगितले. ‘सैंधव’ नामक तेलुगू चित्रपटात नवाझुद्दीन काम करतो आहे, शिवाय अभिनेत्री क्रिती सननची बहीण नूपुरचा नायक म्हणून तो आगामी ‘नूरानी चेहरा’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत त्याचा प्रयोगाचा सिलसिला अजून थांबलेला नाही हेच खरे!

२०२४ मध्ये काय होईल याची कल्पना नाही, पण सध्या मी काळजीपूर्वक भूमिका निवडणार आहे. गेल्या काही चित्रपटांच्या बाबतीत निवड करताना जो विचार मी केला होता प्रत्यक्षात ते तसे उतरले नाहीत. त्यामुळे यापुढे मी विचार करूनच चित्रपटांची निवड करेन. मला फक्त चांगले चित्रपट करायचे आहेत. –नवाझुद्दीन सिद्दीकी

Story img Loader