रेश्मा राईकवार

मुलांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावं की इंग्रजी भाषेतून? हा प्रश्न गेली कित्येक वर्ष पालकांना छळतो आहे. स्वत: मराठीतून शिक्षण घेतलं असल्याने आपल्यात जो इंग्रजी भाषेचा न्यूनगंड आहे किंवा आपल्याला महाविद्यालयीन शिक्षण घेताना ज्या अडचणी आल्या त्या मुलांना येऊ नयेत म्हणून त्यांना सुरुवातीपासूनच इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय पालकांकडून घेतला जातो. गेली काही वर्ष हा प्रश्न फक्त मुंबई – पुण्यातील शहरांना मोठय़ा प्रमाणावर सतावताना दिसत होता. आता हे लोण कोल्हापूर, नाशिक अशा वेगवेगळय़ा जिल्ह्यांतील निमशहरी, ग्रामीण भागातही पसरलं आहे. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत केला जाणारा अतिविचार किंवा आपल्या अनुभवांतून आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादणं किती घातक आहे, याची जाणीव दिग्दर्शक नितीन नंदन यांनी ‘बालभारती’ या चित्रपटातून करून दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक्सच्या कामात हुशार असलेल्या देसाईंना (सिध्दार्थ जाधव) सव्र्हिस सेंटर सुरू करायचं आहे. कुठलाही बिघाड काही सेकंदांत दुरुस्त करण्यात हातखंडा असलेल्या देसाईंना एका कंपनीकडून सव्र्हिस सेंटर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला जातो. मात्र देसाईंना इंग्रजी बोलता येत नाही. मग ते सेंटरमध्ये येणाऱ्या परदेशातील ग्राहकांना कसे हाताळणार? या एका कारणामुळे त्यांना संधी नाकारली जाते. दुकान चांगलं नावारूपाला आलं. आता सव्र्हिस सेंटरच्या रूपाने आपण आणखी एक पाऊल पुढे जावं हे स्वप्न पाहणाऱ्या देसाईंना चांगलाच धक्का बसतो. इंग्रजीमुळे चारचौघांत आपली जी मानहानी झाली ती आपल्या मुलाच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून मराठी शाळेत रमलेल्या आपल्या मुलाला ते इंग्रजी शाळेत टाकतात. मात्र आपण नाहीतर किमान आपला मुलगा फाडफाड इंग्रजी बोलेल ही देसाईंची अपेक्षा प्रत्यक्षात उतरते का? बालशास्त्रज्ञ परीक्षेत उत्तीर्ण होऊन निवडला गेलेला देसाईंचा मुलगा इंग्रजी शाळेतही यशस्वी ठरतो का? तो ज्या शाळेत शिकतो आहे ते सरस्वती विद्यालय ही मराठी शाळाही विद्यार्थीसंख्या कमी होत असल्याने बंद होण्याच्या मार्गावर आहे. शाळेला बंद होण्यापासून वाचवण्यासाठी मुख्याध्यापक महाजन सरांनी केलेले प्रयत्न, भाषेबद्दलचा न्यूनगंड काढून टाकण्यासाठी मराठीतून इंग्रजी शाळेत टाकण्याऐवजी नेमके कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न व्हायला हवेत? अशा कित्येक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर लेखक – दिग्दर्शक नितीन नंदन यांनी गोष्टींच्या ओघात प्रकाश टाकला आहे.

शिक्षणाबद्दल भाष्य करणारा चित्रपट म्हणजे एकतर पालकांसाठी किंवा मुलांसाठी उपदेशाचे डोस पाजणारा चित्रपट अशी सहजभावना होते. हा विषय तर महत्त्वाचा आहे, पण तो उपदेशाचे डोस न वाटता हसतखेळत मनोरंजक भाषेतून तो पोहोचावा, अशा पध्दतीची मांडणी नितीन नंदन यांनी केली आहे. आशयाची हलकीफुलकी मांडणी आणि त्यासाठी त्याच पध्दतीने केलेली कलाकारांची निवड यामुळे चित्रपट तंत्र आणि अभिनयाच्या बाबतीत उत्तम जमून आला आहे. सिध्दार्थ जाधव आणि नंदिता पाटकर हे दोघेही वेगवेगळय़ा अभिनय शैलीसाठी ओळखले जाणारे कलाकार. या दोघांनीही पहिल्यांदाच पती-पत्नीची भूमिका केली आहे. या दोघांमधली वास्तवातील मैत्री पडद्यावरही छान खुलली आहे. आपल्या मुलाचं भलं व्हावं म्हणून आपापल्या परीने धडपडणारे आई आणि वडील या दोघांनी खूप सहजपणे रंगवले आहेत. मुलाशी मैत्रीच्या नात्याने वागणारा, त्याच्या हुशारीने सुखावणारा, पत्नी-आई दोघांनाही आनंदी ठेवणारा, अशा कुठल्याही न्यूनगंडामुळे आपले मोठे स्वप्नच तुटले याने हबकलेला, मुलाला हे दु:ख नको म्हणून लगेच निर्णय घेणारा, प्रसंगी स्वत: धडपडणारा-शिकणारा आणि आपल्या निर्णयाचा फटका मुलाला बसतो आहे म्हणून हतबल झालेला असे एका बापाच्या स्वभावाचे अनेक कंगोरे सिध्दार्थने मनापासून रंगवले आहेत. तोच ,सहजपणा नंदिताच्याही अभिनयात आहे. आर्यन मेघजी हा बालकलाकार आणि त्याच्या मित्रमंडळींनीही अफलातून काम केले आहे. अभिजीत खांडकेकरचा रॉकिंग शिक्षक हा चित्रपटाला वळण देणारा भाग थोडा अधिक रंगला असता तर चित्रपट अजून अर्थपूर्ण झाला असता. मात्र आई-बाबांबरोबर मुलांनीही पाहावा असा हा ‘बालभारती’चा धडा मनोरंजकही आहे आणि हसता हसता विचार करायलाही लावणारा आहे.

बालभारती
दिग्दर्शक – नितीन नंदन, कलाकार – सिध्दार्थ जाधव, नंदिता पाटकर, आर्यन मेघजी, उषा नाईक, अभिजीत खांडकेकर, रवींद्र मंकणी,