प्रिय इरफान,
जिथे सबंध चित्रपटसृष्टी ही फक्त दिसण्यावर, सौंदर्यावर भुलते असं वाटलं, तिथे तुझ्या अभिनयाने एक वेगळंच समाधान मनाला दिलं. जेमतेम दिसणारा माणूस बॉलिवूडमधला इतका मोठा अभिनेता होऊ शकतो आणि त्याच्या अभिनयाचं सौंदर्य तरुणींनाही आकर्षित करु शकतो हे तू पटवून दिलंस. तुझ्या चित्रपटांनी माझ्यासारख्या तरुणीला एक वेगळीच शिकवण दिली. माझ्यासारख्या म्हणजे.. ज्यांच्या मनावर चित्रपटांचा फार प्रभाव असतो, ज्यांना उदास वाटत असताना एखादा चित्रपटातला डायलॉगसुद्धा सहज प्रसन्न करू शकतो. म्हणूनच आज जेव्हा तुझ्या निधनाची बातमी समजली, तेव्हा एक खूप जवळची व्यक्ती आपण गमावली या भावनेने मनात दु:ख दाटून आलं. जो सर्वांना प्रिय असतो.. तो देवालाही प्रिय असतो.. या वाक्याचाही राग येऊ लागला.
‘मदारी’तल्या तुझ्या भूमिकेने मनात करुणा निर्माण केली, तर ‘लाइफ ऑफ पाय’ने जगण्याचा एक अनोखा संदेश दिला, ‘लंचबॉक्स’मधलं तुझं अव्यक्त प्रेम पाहून मन भरुन आलं तर ‘पिकू’मध्ये तुला पाहून चेहऱ्यावर हसू उमटलं, ‘हिंदी मीडियम’मधून तू लोकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलंस आणि ‘करीब करीब सिंगल’मधून तू प्रेमाची नवीन परिभाषा मांडलीस. या साऱ्या चित्रपटांमधून एकच गोष्ट कळत होती, की तुला पडद्यासमोर येऊन फक्त लोकांचं मनोरंजन करायचं नाहीये, तर त्यांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांना आपलंसं करायचं आहे. तुला कॅन्सर झाल्याचं वृत्त कळलं तेव्हा मनात धस्स झालं. पण जबर इच्छाशक्तीने तू त्यावर यशस्वी मात करून पुन्हा आमच्यासमोर येशील असं वाटलं. तुझ्या परीने तू खूप प्रयत्नसुद्धा केलेस. पण नियतीला काहीतरी वेगळंच अपेक्षित होतं. कॅन्सरच्या लढ्यातही जेव्हा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलास, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरील हास्याने दिलासा दिला की, तू सगळ्यांवर मात करून पुन्हा येशील. तू काय झेलतोयस, किती सहन करतोयस हे मात्र नंतर तुझ्या त्या पत्रातून स्पष्ट झालं. रुग्णालयात असताना तू चाहत्यांसाठी हे पत्र लिहिलं होतंस. “मी माझ्या स्वप्नात रमलो होतो पण अचानक असं वाटलं की, टीसीने पाठीवर थाप मारली आणि म्हटलं- तुमचं स्टेशन आलं आहे, कृपया खाली उतरा आता”, या तुझ्या एका वाक्यातूनच सगळी परिस्थिती डोळ्यांसमोर उभी राहिली.
कॅन्सरवर मात करून पुन्हा पडद्यावर झळकण्याची जबर इच्छा तुझ्यात होती. या इच्छेखातरच ‘अंग्रेजी मीडियम’चं शूटिंग पूर्ण केलंस. या संपूर्ण प्रवासात कधीच तुझा कोमेजलेला चेहरा आम्हाला दिसला नाही.
या झगमगाटाच्या इंडस्ट्रीत साधंसरळ राहणं कधीच सोपं नसतं. मात्र तू त्याला अपवाद ठरलास. कुठलाही गॉडफादर नसताना, घराणेशाहीला न जुमानता स्वत:च्या बळावर तू नाव कमावलंस. विशेष म्हणजे, कोणत्याही टीकाटीप्पणीच्या चक्रात तू अडकला नाहीस.
असे खूप कमी कलाकार असतात, जे मोठमोठ्या बॅनरखाली काम करत नाहीत, त्यांचे चित्रपट २००-३०० कोटींची कमाई करत नाहीत, त्यांना ग्लॅमरस राहायला आवडत नाही, पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. तसाच तू आहेस. वीस-तीस वर्षांनंतरही जेव्हा कधी तुझा चित्रपट पाहू, तेव्हासुद्धा त्यातून कोणाला तरी जगण्याची प्रेरणा मिळेल, कोणाला प्रेमाची नवी व्याख्या समजेल तर कोणाच्या चेहऱ्यावर सहज हास्य उमटेल.
यापुढे तुला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहता येणार नाही याची खंत तर आहेच. पण तू ज्या पद्धतीने एका कलाकाराची प्रतिमा चाहत्यांसमोर ठेवलीस त्याबद्दल मनात खूप आदरसुद्धा आहे. फक्त तुझी जाण्याची वेळ योग्य नव्हती…
या पत्राच्या शेवटी तुझ्याच चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिते… “वो जो था ख्वाब सा, क्या कहें जाने दें.. ये जो है कम से कम, ये रहे के जाने दें”
swati.vemul@indianexpress.com