रेश्मा राईकवार

आपल्याला डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या आपल्या चाहत्यांना काहीतरी चांगला, दर्जेदार आशय पाहायला मिळेल यासाठी चांगल्या गोष्टीचा शोध घेण्यापासून हरएक प्रयत्न या लोकप्रिय नायकांनी केले असतील अशी किमान अपेक्षा प्रेक्षकांच्या मनात कुठेतरी असतेच. मात्र नवं आणि बरं काही निर्माण करावं यासाठी झगडण्यापेक्षा कथेपासून ते आपल्याच नाच-गाणं, संवादाच्या शैलीतील ज्या ज्या लोकप्रिय त्या त्या गोष्टी पेरून नवा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारण्याचं एक अजब तंत्र या बॉलीवूडच्या ‘स्टार’ कलाकारांनी गेल्या काही वर्षांत घोटून घेतलं आहे. याची प्रचीती चित्रपटाच्या नावापासून ते नायकाच्या अभिनयापर्यंत कशातच जान नसलेला ‘किसी का भाई किसी की जान’ नावाचा सुमारपट आपल्याला देतो.

भाईचा चित्रपट आणि ईदचा मुहूर्त हे समीकरण रेटून का होईना यशस्वी करण्यासाठीच ‘किसी का भाई किसी की जान’ सारख्या तद्दन नावातच उथळ असलेल्या चित्रपटाचा घाट घातला गेला आहे. कधीकाळी ‘प्रेम’ नावाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या सलमान खानला या चित्रपटात नावच उरलेलं नाही. यात तो ‘भाईजान’ म्हणूनच प्रेक्षकांसमोर आला आहे. मग भाईजान का? तर त्यासाठी नायक मुळात अनाथ असला पाहिजे. त्याला कोणीतरी भाई म्हणणारी मुलं हवीत तर तो मोठय़ा भावाच्या भूमिकेत शिरेल. आणि मुळात असा नायक दयावान, हिम्मतवान असा सगळा सर्वसमावेशक भावना आणि नीतिमूल्यांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा असतो. मग ते दाखवण्यासाठी जे काही आवश्यक प्रसंग आहेत ते जोडले गेले आहेत. अन्यायाची त्याला चीड येते, त्यामुळे त्याच्या मागे एखाद-दोन गुंड कसे लागतील? पूर्ण गुंडाराज त्याच्या पाठीशी हात धुऊन लागलेलं असतं. त्याशिवाय, वेगवेगळय़ा धाटणीतील अॅक्शनदृश्ये कशी दाखवता येतील.. त्यामुळे मुळात तो गुंड प्रवृत्तीचा नायक नाही, पण अन्यायाविरुद्ध लढायचं तर गुंडाला गुंडासारखंच प्रत्युत्तर द्यावं लागतं. तसा तो सोईने केवळ अन्यायाविरोधात लढण्यासाठी गुंड प्रवृत्तीने वागणारा सद्गुणी नायक आहे. त्याला तीन भाऊ आहेत. तीन भावांच्या तीन नायिका आहेत. पण जोपर्यंत भाईजानसाठी नायिका नाही, तोवर तीन भावांच्या प्रेमकथेला काही अर्थ नाही. म्हणून नायिकेचा शोध घेतला जातो. आणि मग पूर्वार्धातलं ‘भाई’ माहात्म्य संपलं की उत्तरार्धात तो ‘जान’ म्हणून असलेलं त्याचं अवतारकार्य सुरू करतो.

दोन भागांत असलेल्या त्याच्या या अवतारकार्यात लोकांना काहीतरी नवं दिसावं म्हणून सलमान खानचे मुख्यत: तीन आणि शेवटचा सगळय़ांच्या परिचयाचा असे चार लुक खर्ची पडले आहेत. शाहरुख नावाच्या मित्राचा इतका प्रभाव पडावा की.. पहिल्याच लुकमध्ये सलमान खान मोठे केस वाढवून, पोनी बांधून वावरताना दिसतो. दुसऱ्या लुकमध्ये त्याने केस बारीक कापले आहेत. तर तिसऱ्या लुकमध्ये दाढीही काढून अगदी गुळगुळीत चेहऱ्याचा सलमान आपल्याला दिसतो. आणि अगदी शेवटच्या प्रसंगात शर्ट काढून वगैरे.. बाकी लुंगीवर म्हटलेली दोन-दोन गाणी आहेतच. आणि नाचण्यातही काही वेगळं देता येत नसल्याने किमान लुंगीचा वापर करून घेता आला आहे. तर अशा पद्धतीने ओढूनताणून केलेले लुक आणि कलाकारांची ही मोठी फौज घेऊन भाईजानने चित्रपट केला आहे.

बरं किती गोष्टी जोडाव्यात.. अगदी भाईचं पहिलं प्रेम म्हणून अभिनेत्री भाग्यश्रीने सहकुटुंब सहपरिवार चित्रपटात हजेरी लावली आहे. वाट लागली त्या ‘मैने प्यार किया’च्या आठवणींची.. मग दुसरी आणि खरी नायिका चित्रपटात प्रवेश करते, ती आहे पूजा हेगडे. त्यातल्या त्यात पूजाने आपल्या वाटय़ाला जे काही करायची संधी आली आहे ती आपल्या शैलीत साकारण्याचा प्रयत्न केला आहे. मग भाई दक्षिणेत उतरला आहे. हा भाग किमान दक्षिणेकडील रंगीबेरंगी संस्कृती, वातावरण यामुळे पाहण्यासारखा झाला आहे. शिवाय, दिमतीला दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश, भाईची दुसरी नायिका जी इथे व्यंकटेशच्या पत्नीच्या भूमिकेत आहे ती अभिनेत्री भूमिका चावला, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी असे चांगले कलाकार आहेत. व्यंकटेश यांना खूप काळाने हिंदूीत पाहणं हा चांगला अनुभव आहे. शेवटी चित्रपट भाईचा आहे तरीही व्यंकटेश यांना तगडी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे हेही नसे थोडके. गाण्यापुरता का होईना दाक्षिणात्य अभिनेता रामचरणही आपली झलक दाखवून जातो. नायकाची गोष्ट उठून दिसण्यासाठी खलनायक ताकदीचा लागतो. इथेही दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू यांचा प्रवेश आहे. शिवाय, दिल्लीतला खास खलनायक म्हणून बॉिक्सगपटू विजेंदर सिंगही आहे. आणि खूप सारे गुंड आहेत, ज्यांना भाई मार मार मारतो.

आता हे सगळं असं सांगावं लागतं, कारण ते तसंच आहे. त्यामुळे हे तुकडे तुकडे जुळवले की हा चित्रपट काय आहे हे तुमच्या लक्षात येईलच. गाणी फारशी श्रवणीय नाहीत. भाईच्या नृत्यालाही उतरती कळा लागली आहे. अशा चित्रपटाचा दिग्दर्शक कोण? हा प्रश्न पडतच नाही खरंतर.. तरी दिग्दर्शन फरहाद सामजी यांचे आहे. एक दिग्दर्शक कबीर खान होता ज्याने सलमानला ‘भाईजान’ म्हणून लोकप्रिय केलं. तर दुसरा फरहाद सामजी ज्यांनी ‘भाईजान’ची असलेली लोकप्रियता पणाला लावली आहे. त्यामुळे चित्रपट संपता संपता भीती एकच होती ती म्हणजे भाई प्रेक्षकांचा जीव दुसऱ्या भागातही अडकवणार की काय? पण सुदैवाने तसं काही होत नाही. उलट मंडळी मोठमोठय़ाने ‘दी एन्ड’ म्हणून जाहीर करतात. त्यामुळे जीव भांडय़ात पडतो.

किसी का भाई किसी की जान
दिग्दर्शक – फरहाद सामजी
कलाकार – सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश, रोहिणी हट्टंगडी, जगपती बाबू, भूमिका चावला, जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धर्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी, सतीश कौशिक, आसिफ शेख.