सध्या टीआरपीची गणितं इतक्या झपाट्याने बदलत आहेत की अगदी काही दिवसांपूर्वी गाजावाजा करत सुरू झालेल्या मालिकांनाही प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी गाशा गुंडाळावा लागत आहे. एकेका वाहिनीच्या झटकन तीन मालिका बंद होणं, तितक्याच नवीन मालिकांच्या जाहिराती वाहिन्यांवर झळकणं हा प्रकार गोंधळवून टाकणारा असला तरी प्रेक्षकांना मात्र त्यामुळे नवनवीन मालिकांची पर्वणी मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्यापासूनच वेगवेगळ्या वाहिन्यांवर नव्या मालिकांचा श्रीगणेशा होणार आहे. काही मराठी वाहिन्यांवरील जुन्या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी नव्या मालिका, नवे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातील काही मालिका या हिंदी वा अन्य भाषिक मालिकांच्या रिमेक आहेत, तर काही मालिका नवीन कथानक घेऊन प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. याशिवाय, काही रिअॅलिटी शोसुद्धा येऊ घातले असून त्यातूनही प्रेक्षकांची करमणूक होणार आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या अनेक नवीन मालिका प्रसारित झाल्या आहेत. तर आणखी काही नवीन मालिका लवकरच प्रसारित होणार आहेत. या प्रसारित नवीन मालिकांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ आणि ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ या दोन मालिकांचे प्रोमो सध्या लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ आणि कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई तुळजाभवानी’ या नवीन मालिका आणि सोनी मराठी वाहिनीवरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा रिअॅलिटी शोही चर्चेचा विषय ठरले आहेत.

हेही वाचा >>>१४ दिवसांत घराबाहेर आलेल्या संग्राम चौगुलेची पहिली पोस्ट! Bigg Boss Marathi च्या प्रवासाबद्दल म्हणाला…

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ आणि ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ या दोन्ही नवीन मालिकांमध्ये नावाजलेल्या कलाकारांची फौज आहे. ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेचे शीर्षक ऐकता क्षणीच आपल्या डोळ्यांसमोर आपले आई-बाबा उभे राहातात. आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी राहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात. आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेची कथादेखील अशाच एका दाम्पत्याभोवती फिरते, ज्यांना खरं तर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त व्हायचे आहे पण या न संपणाऱ्या जबाबदारीचं ओझं त्यांच्यावर नकळतपणे लादलं गेलं आहे. या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते, नाट्य दिग्दर्शक मंगेश कदम ही वेगळी जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर याने या मालिकेचं कथालेखन केलं असून तब्बल १५ वर्षांनंतर त्याने स्टार प्रवाह वाहिनीसाठी मालिकेचं लेखन केलं आहे.

पौराणिक मालिकांना स्टार प्रवाह वाहिनीच्या मनोरंजन यादीत हमखास स्थान असतं. ‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांच्या यशानंतर पुन्हा एकदा वाहिनीने ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या नव्या पौराणिक मालिकेचा घाट घातला आहे. नावाप्रमाणे साडेतीन शक्तिपीठांचा महिमा आणि त्यांची सुरुवात कशी झाली याबद्दल या मालिकेद्वारे प्रेक्षकांना माहिती देण्यात येणार आहे. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कापडणे प्रमुख भूमिकेत झळकणार असून ११ ऑक्टोबरपासून ही मालिका प्रसारित होणार आहे. ‘प्रेक्षकांना मालिकेच्या रूपात नवनव्या गोष्टी सांगणे हे स्टार प्रवाह वाहिनीचं वेगळेपण आहे. येत्या काही दिवसांत ‘उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तिपीठांची…’ या मालिकेतून साडेतीन शक्तिपीठांच्या आजवर न ऐकलेल्या कथा या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तर, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत ज्यांचं बोट धरून आपण चालतो, जी पावलं आपल्याला बळ देतात तीसुद्धा कधीतरी थकतील, त्यांनासुद्धा त्यांच्या जबाबदारीतून कधी तरी मुक्तता मिळायला हवी. हे अधोरेखित करणारी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. ही मालिका सर्वांच्या घरात आणि मनात स्थान निर्माण करेल’, असा विश्वास स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>Wildcard संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसांत घराबाहेर! ‘हे’ आहे कारण; नेटकरी म्हणाले, “अरबाजला वाचवायला…”

झी मराठी वाहिनीवर एका परीने सध्या सगळ्या नवीन मालिकाच सुरू आहेत. तरीही या मालिकांमध्ये ‘सावळ्याची जणू सावली’ या नवीन मालिकेची १६ सप्टेंबरपासून भर पडली आहे. या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील ‘कृष्णकोळी’ या बंगाली मालिकेवरून बेतलेली आहे. ही कथा सावली नावाच्या एका मुलीची आहे, जी रंग रूपाने साधारण, पण स्वभावाने प्रेमळ, शब्दाची पक्की आणि अत्यंत सुरेल आवाजाची आहे. सावली बारावीपर्यंत शिकली आहे आणि संगीतात एमए करणं हे तिचं स्वप्न आहे. विठ्ठलावर अपार श्रद्धा असलेली, कितीही विपरीत स्थितीतून मार्ग निघू शकतो अशा आशावादी विचारांच्या, कुटुंबावर अपार प्रेम करणाऱ्या या तरुणीचं भविष्य कसं असेल? या गोष्टी या मालिकेतून हळूहळू उलगडत जाणार आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर, वीणा जगताप, गौरी करण, आशीष कुलकर्णी, भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे या लोकप्रिय कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय, ‘लक्ष्मी निवास’ या कन्नड मालिकेचा रिमेक असलेल्या नव्या मालिकेची घोषणाही वाहिनीने केली असली तरी ही मालिका कधी सुरू होणार? याबाबत तपशील उलगडलेले नाहीत. झी मराठी वाहिनीवर ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेबरोबरच येत्या काळात आणखी काही नवीन आशय आणि उत्तम कलाकारांसह नवनवीन मालिका भेटीला येणार असल्याचं सूतोवाच झी मराठी वाहिनीच्या मुख्य अधिकारी व्ही. आर. हेमा यांनी केलं आहे. झी मराठीतर्फे नेहमीच नवनवीन मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतून समाजाने वर्णभेद पूर्णपणे बंद केला पाहिजे. व्यक्तीच्या वर्णापेक्षा त्याच्या कलागुणांना पाहावं, हा संदेश या मालिकेतून देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कलर्स मराठी वाहिनीवर अवघ्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची अर्थात ‘आई तुळजाभवानी’ची गाथा सांगणारी मालिका घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजेच ३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणार, दुर्जनांच्या नाशासाठी अष्टभुजा ‘आई तुळजाभवानी’ या घोषवाक्यासह आलेल्या या मालिकेतून तुळजाभवानीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे ही आई तुळजाभवानीच्या रूपात दिसणार असून मालिकेची झलक सध्या प्रोमोमधून दिसत असली तरी अन्य कलाकारांची नावं अजून जाहीर झालेली नाहीत.

तसंच, सोनी मराठी वाहिनीवर संगीताचा सुरेल नजराणा रसिकांना देणारा ‘सुपरस्टार सिंगर’ हा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. सोनीच्या हिंदी वाहिनीवरील ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमाच्या तिन्ही सीझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवरदेखील रंगणार आहे. या कार्यक्रमाचं परीक्षण संगीत दिग्दर्शक- गायक अमितराज आणि गायिका प्रियांका बर्वे करणार असून रोहित राऊत, शाल्मली सुखटणकर, आशीष कुलकर्णी, संपदा माने-कदम आदी कलाकार हे कॅप्टन असणार आहेत.

गणेशोत्सवाची धामधूम अनुभवल्यानंतर आता नवरात्रीच्या जल्लोषाकडे सगळ्यांची नजर आहे. या उत्सवी आनंदात नवीन मालिकांची सुरुवात ही प्रेक्षकांच्या आनंदात अधिक भर घालणारी ठरो !

सावळ्याची जणू सावली’

आई तुळजाभवानी’

आई आणि बाबा रिटायर होत आहेत’