गेल्या काही वर्षात अनेक जुन्या गाण्यांना नव्याने तयार करण्यात आले. तरुण पिढीला आवडेल असे संगीत देऊन ती गाणी वेगळया अंदाजात प्रेक्षकांसमोर येतात. त्यातली काही गाणी हिट होतात तर काही गाण्यांचे हे नवीन व्हर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही. गेले काही दिवस नेहा कक्करच्या ‘ओ सजना’ या गाण्यावरून बराच वाद चालला आहे. हे गाणे म्हणजे ‘मैने पायल है छनकाई’ या गाण्याचे नवे व्हर्जन आहे. या गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठक हिने या नव्या गाण्यावर आक्षेप घेतला असून त्यांच्यात वाद सुरु आहेत. अशात अनेक कलाकार यावर आपली मतं मांडत आहेत. यात सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान यांनीही आपले मत मांडले आहे.
आणखी वाचा : कॅनडाच्या आणखी एका रस्त्याला ए.आर.रेहमानचं नाव : खुद्द रेहमानने ट्वीट करत दिली खुशखबर
एका मुलाखतीत ए आर रहमानने सांगितलं, “रिमिक्सच्या नावाखाली संगीताची हानी होते आहे. त्यातून जे कानावर येते ते ऐकावेसेही वाटत नाही.” त्यासोबत नेहा कक्करचे बॉलिवूडमधील जे रिमिक्स कल्चर आहे त्याविषयीही त्याने नाराजी व्यक्त केली आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत नेहाचे नाव न घेता तिच्यावर टीका केली आहे. तो म्हणाला, “एखाद्या गाण्याचे रिमिक्स केल्यावर त्याच्या मूळ गाण्यालाही धक्का पोहोचतो. तसेच त्या मूळ संगीत दिग्दर्शकाच्या भावांनाही धक्का लागतो. मला अनेकजण विचारतात की तुम्ही एखादं जुनं गाणं नव्याने तयार करणार का? एखाद्या गाण्याचे रिमिक्स करणारे तुम्ही कोण? मी माझ्या कामाबरोबरच दुसऱ्याच्या कामाचीही काळजी घेत असतो. काम करताना तुम्ही समोरच्याचा कामाचा आदर ठेवला पाहिजे.”
हेही वाचा : जन्माने हिंदू असलेल्या एआर रेहमान यांनी का स्वीकारला होता इस्लाम धर्म? जाणून घ्या
दरम्यान, ए आर रहमानचा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा ए आर रहमान यांनी सांभाळली आहे. ३० सप्टेंबरला या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलगू, मळ्यालम आणि तेलगू भाषेत रिलिज होणार आहे. या मल्टीस्टारर सिनेमामध्ये विक्रम बाबू, ऐश्वर्या राय, शोभिता धूलिपाला, प्रकाश राज, रवि, तृषा आणि शरद कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.