भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी कमी वयात प्रचंड लोकप्रियता मिळवली. पण दुर्दैवाने त्यांनी कमी वयातच या जगाचा निरोप घेतला. कोणी अपघातात जीव गमावला, कुणी आत्महत्या केली तर कुणी गंभीर आजाराने गेलं. दिव्या भारती, सुशांत सिंग राजपूत, जिया खान अशा बऱ्याच कलाकारांचा या यादीत समावेश आहे. पण भारतात एक अशी गायिका होऊन गेली, जिने तिच्या छोट्याशा करिअरमध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल १० हजार गाणी गायली. राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आणि अवघ्या ३७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
ही गायिका ए.आर. रहमान यांची आवडती गायिका होती. रहमान यांनीच संगीतबद्ध केलेल्या गाण्यासाठी तिला पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आम्ही ज्या गायिकेबद्दल बोलतोय तिचं नाव स्वर्णलता. स्वर्णलता हे हिंदी आणि दक्षिण भारतीय संगीत उद्योगातील एक लोकप्रिय नाव होतं. १२ सप्टेंबर २०१० रोजी तिचा मृत्यू झाला. तिने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली.
‘डीएनए’च्या वृत्तानुसार, स्वर्णलताने दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी सर्वात जास्त गाणी गायली होती. पण तिच्या सुमधूर आवाजाने ती देशभरात प्रसिद्ध होती. तिच्या गायकीचे देशभरात चाहते आहेत. तिने ‘नीतीक्कु थंडनई’ मधील केजे येसुदासबरोबर ‘चिन्नाचिरु किलीये’ हे प्रसिद्ध गाणे गायल्यानंतर तिला लोकप्रियता मिळाली. स्वर्णलताने लहान वयातच भारतीय संगीत उद्योगात स्वत:चे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले.
ऑस्कर विजेते प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रहमान यांनी एकदा सांगितलं होतं की स्वर्णलता ही त्यांची आवडती गायिका आहे. स्वर्णलताचा जन्म १९७३ साली केरळमध्ये झाला आणि चेन्नईमधील मलार हॉस्पिटलमध्ये ३७ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. ती फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती, यातच उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. स्वर्णलताला ‘करुथथम्मा’ चित्रपटातील तिच्या ‘पोराले पोन्नूथाई’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. हे गाणं ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलं होतं.