आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा संपूर्ण जगातील कला आणि साहित्यविश्वाला मोठा फटका बसला आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सगळी कामं अगदी चुटकीसरशी व्हायला लागली आहेत. भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या, ‘द मोझार्ट ऑफ मद्रास’ म्हणून साऱ्या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या संगीतकार ए आर रेहमानसुद्धा याच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सध्या चर्चेत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सलाम’ या चित्रपटाला ए आर रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात रेहमान यांनी दोन दिवंगत गायकांचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पुन्हा लोकांसमोर आणला आहे.
आणखी वाचा : “तेव्हा शाहरुखपेक्षा मी…” ‘बाजीगर’च्या आठवणी शेअर करताना जॉनी लिवर यांनी केला मोठा खुलासा
बंबा बाक्या आणि शाहूल हमीद या दोन दिवंगत गायकांचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने पुनरुज्जीवित करत चित्रपटातील एक गाणं त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करून सादर केलं आहे. रेहमान यांनी असं करण्याआधी त्या गायकांच्या कुटुंबियांची रीतसर परवानगी घेतली असल्याचं ट्वीटही केलं. परंतु तरीही काही लोकांना मात्र रेहमानसारख्या दिग्गज संगीतकाराने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला खटकला आहे.
काहींनी रेहमान यांच्या या कृतीचं कौतुक आणि समर्थन केलं आहे तर काहींनी एआर रेहमान यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. काही चाहत्यांना रेहमान यांचा हा प्रयोग प्रचंड आवडला असून त्यांनी एसपी बालसुब्रमण्यम यांचाही आवाज अशाच पद्धतीने पुन्हा वापरण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावर मात्र बऱ्याच लोकांनी रेहमान यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. कुटुंबियांची परवानगी घेतली असली तरी तंत्रज्ञानाचा हा असा वापर अत्यंत धोकादायक असल्याचं काहींनी मत मांडलं आहे.
एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. अन् याचं जेव्हा पेव फुटलं होतं तेव्हा ए आर रेहमान हे पहिले संगीतकार होते ज्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. चीनमधील एका शाळेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होत असतानाचा एक व्हिडीओ शेअर करत रेहमान यांनी ही चिंता व्यक्त केली होती. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “मला नव्या पिढीची दया येते…हे नवे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी ‘शाप आहे की वरदान?’ हे येणारा काळच सांगेल.” परंतु आता स्वतःच आपल्या क्षेत्रात याच तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या रेहमान यांना लोकांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
९ फेब्रुवारी रोजी ‘लाल सलाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने पुन्हा दिग्दर्शनात कमबॅक केलं. यामध्ये रजनीकांत हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले असून त्यांचा यातील स्वॅग प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ‘जेलर’च्या तुलनेत रजनीकांत यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही, पण रेहमान यांनी केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.