पुण्यातील राजा बहादूर मिल परिसरात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांच्या शोचे रविवारी आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राजकीय, प्रशासकीय अधिकारी, क्रीडा या क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. ही सर्व मंडळी ए. आर. रेहमान यांच्या गाण्याचा आनंद लुटत होती. हा कार्यक्रम रंगात आला असताना पोलीस पोहोचले आणि त्यांनी हा कार्यक्रम बंद केला होता. या संपूर्ण गोंधळानंतर पुण्याच्या कॉन्सर्टबद्दल ए.आर. रेहमान यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Video: पुण्यातील ए आर रेहमान यांचा शो पोलिसांनी थांबवला; मंचावर येऊन अधिकाऱ्यांनी सुनावले खडेबोल
“काल आपण सर्वांनी स्टेजवर ‘रॉकस्टार’ क्षण अनुभवला होता का? मला वाटतं की आम्ही ते केलं! प्रेक्षकांच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो. पुणे, अशा अविस्मरणीय संध्याकाळसाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्या रोलर कोस्टर राईडचा हा एक छोटासा भाग आहे,” असं कॅप्शन ए.आर. रेहमान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये रेहमान यांच्यासह इतर आर्टिस्टच्या परफॉर्मन्सच्या झलक पाहायला मिळतात.
नेमकं काय घडलं होतं?
नियमानुसार रात्री दहानंतर साऊंड लावण्यास परवानगी नसते. पण तरीदेखील ए. आर. रेहमान यांच्या गाण्याचा शो सुरू होता. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी स्टेजवर जाऊन ए. आर. रेहमान यांना सांगितले. तुम्ही रात्री दहानंतर शो सुरू ठेवू शकत नाही. लवकरात लवकर शो बंद करावा, असे त्यांना सांगितले. त्यावर ए. आर. रेहमान शो बंद करून तेथून निघाले. त्यामुळे उपस्थितांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळालं होतं.