रेश्मा राईकवार

समस्त देश ज्या व्यक्तीला देव मानतो त्या व्यक्तीने देवत्वाच्या, साधुत्वाच्या बुरख्याआड केलेल्या अमानुष कृत्यांना वाचा फोडणं ही सोपी गोष्ट नाही. कायद्याच्या चौकटीत राहून ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याला न्याय मिळवून देणं किंवा गुन्हेगाराला शिक्षा देणं वा वाईटाविरुद्ध चांगल्याची लढाई यापलीकडे अशा घटनेचे कित्येक सामाजिक पैलू, संदर्भ असतात. आणि त्याचे परिणाम वर्षांनुवर्ष समाजमानसावर राहतात. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंविरुद्ध एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लढवण्यात आलेला खटला आणि त्या प्रकरणात जोधपूर न्यायालयाने त्यांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा ही घटना साधीसुधी नव्हती. अशा अनेक स्वयंघोषित बापू-महाराजांवर अंधविश्वास ठेवणाऱ्यांसाठी ते झणझणीत अंजन होतं. तर स्वामी-महाराज असा बुरखा पांघरून आपण आपली दुष्कृत्ये लपवू शकतो हा गंड बाळगणाऱ्यांना सणसणीत चपराक होती. हा खटला लढवणाऱ्या पी. सी. सोलंकी या वकिलाच्या कथेच्या माध्यमातून या घटनेचे विविधांगी पैलू उलगडून सांगणारा वास्तवदर्शी, संवेदनशील आणि प्रभावी चित्रपट म्हणून ‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपट पाहायला हवा.

ओटीटी माध्यमावर गेल्या काही वर्षांत अनेक वेगळे, संवेदनशील विषय वेबमालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून हाताळले गेले आहेत. चित्रपटगृहातून प्रेक्षक येवोत न येवोत.. ओटीटीवरून मात्र असे चित्रपट जगभरातील लोकांपर्यंत पोहोचतात आणि ते पाहिलेही जातात हे लक्षात घेत ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट ‘झी ५’ वाहिनीवरून प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा निर्णय स्तुत्यच म्हणावा लागेल. मात्र चित्रपटाचा कथाविषयच मुळात सनसनाटी आहे. असे विषय ओटीटी माध्यमावर कुठल्याही प्रकारे सेन्सॉरशीप नाही म्हणून अतिनाटय़ निर्माण करत, अतिरंजित मांडणीत चित्रपट वा वेबमालिकेतून दाखवले जातात. या पार्श्वभूमीवर ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित चित्रपट एक सुखद धक्का आहे. या खटल्याचं महत्त्व देशाच्या, लोकांच्या दृष्टीने काय होतं हे शब्दांत पकडणं कठीण आहे आणि त्यामुळे मूळ प्रसंगासह खटला उलगडून सांगत त्यातला गर्भितार्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे, अशी माहिती या चित्रपटात सोलंकी यांची मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता मनोज वाजपेयी यांनी दिली होती. त्याची प्रचीती चित्रपट पाहताना येते.

आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसाराम बापूंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणारी नू आणि तिचे आई-वडील यांच्यापासून कथेला सुरुवात होते. अत्यंत प्रतिष्ठित अशा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे हे त्याक्षणी तक्रार नोंदवणारी महिला पोलीस अधिकारी तत्काळ वरिष्ठांपर्यंत पोहोचवते आणि वेगाने सूत्रे हलू लागतात. पोक्सो कायद्यांतर्गत बापूंविरोधात दाखल झालेला गुन्हा, त्यांना तत्काळ करण्यात आलेली अटक आणि मग जोधपूर न्यायालयात सुरू झालेली कायदेशीर प्रक्रिया ते प्रत्यक्ष निकाल अशी सविस्तर मांडणी या चित्रपटात पाहायला मिळते. सोलंकी हे काही नामवंत वकील नव्हे, मात्र अत्यंत प्रामाणिकपणे वकिली करणाऱ्या या व्यक्तीसमोर नू आणि तिचे आई वडील खटला लढवण्याची विनंती करण्यासाठी येतात तेव्हा अत्यंत शांतपणे आणि न घाबरता ते होकार देतात. इतकंच नव्हे तर नू आणि तिच्या आई-वडिलांना पुढच्या परिस्थितीची, आव्हानांची कल्पना देत स्वत:ही खटला लढवण्यासाठी कंबर कसतात. प्रामाणिकपणा आणि व्यवसायातील हुशारी, चाणाक्ष बुद्धी या जोरावर सोलंकी यांच्यासारख्या सामान्य वकिलाने या असामान्य परिस्थितीला तोंड कसे दिले, आसाराम बापूंना वाचवण्यासाठी आलेली नामवंत वकील मंडळी आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना जामीन मिळू द्यायचा नाही या तयारीने सोलंकी यांनी लढवलेली खिंड, खटला सुरू झाल्यानंतर साक्षीदारांचे हत्यासत्र, स्वत:वर झालेला हल्ला, वाढवण्यात आलेली सुरक्षा, एक पिता-मुलगा आणि माणूस म्हणून झालेली घालमेल असे कित्येक पैलू अत्यंत सुटसुटीत, कुठलाही नाटय़ाभिनिवेश न आणता वास्तवदर्शी पद्धतीने दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांनी मांडले आहेत.

विषयातील संवेदनशीलता आणि त्यातून प्रेक्षकांपर्यंत नेमके काय पोहोचवायचे आहे याबद्दल कथेत असलेली सुस्पष्टता दिग्दर्शकीय मांडणीतही दिसते.  त्यामुळे कुठल्याही प्रकारची आक्रस्ताळी मांडणी चित्रपटात नाही, न्यायालयीन खटल्याचे चित्रण असल्याने नाटय़पूर्णतेला वाव असताना त्याचीही मांडणी अत्यंत संयतपणे आणि अधिक हुशारीने करण्यात आली आहे. संवादही कुठे पाल्हाळिक वा बटबटीत नाहीत. याचे श्रेय पटकथा लेखक दीपक किंगरानी यांनाही जाते. अभिनयाच्या बाबतीत अर्थात संपूर्ण चित्रपट पी. सी. सोलंकी यांच्या व्यक्तिरेखेतून उलगडत असल्याने तो भार अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या खांद्यावर आहे. मनोज वाजपेयी यांनी या भूमिकेसाठी एक वेगळी देहबोली, संवादाची ढब पकडत प्रामाणिक पण चाणाक्ष अशा सोलंकींची भूमिका सहजशैलीत प्रभावीपणे साकारली आहे. न्यायालयातील जुगलबंदी असो वा स्वत:च्या मुलाबरोबर, आईबरोबरचा संवाद-नाते, नू बरोबरचा संवाद असे कित्येक प्रसंग मनोज वाजपेयी यांच्या अभिनयाबरोबरच प्रभावी दिग्दर्शकीय मांडणीमुळे उत्तम जमून आले आहेत. अर्थात कोणा एका व्यक्तिरेखेवर जोर देताना इतर व्यक्तिरेखा झाकोळल्या जातात. तीच बाब इथेही दिसते. या संपूर्ण प्रकरणात दिल्ली पोलीस, जोधपूर पोलीस आणि मुळातच नू आणि तिचे आई-वडील यांनी मोठय़ा धैर्याने उचललेले पाऊल या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कथेच्या ओघात या गोष्टी जाणवत असल्या तरी त्यावर पुरेसा प्रकाश टाकला गेलेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात हा चित्रपट एकसुरी वाटतो, मात्र वर सांगितल्याप्रमाणे कायद्यातील कोणत्या महत्त्वाच्या बाबींवरून हा खटला लढवला गेला याचे हुशारीने चित्रण करण्यात आले असल्याने चित्रपट रटाळ वाटत नाही. आशय-अभिनय या सगळय़ाच बाबतीत जमून आलेला ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा संवेदनशील भावानुभव आहे.

 सिर्फ एक बंदा काफी है

दिग्दर्शक – अपूर्व सिंग कार्की

कलाकार – मनोज वाजपेयी, अद्रिजा, कौस्तुव सिन्हा, सूर्यमोहन कुलश्रेष्ठ, जयहिंदू कुमार, दुर्गा शर्मा.