ऐंशीच्या दशकात मालवणी नाटकांच्या लाटेत आलेलं भद्रकाली प्रॉडक्शन्सचं ‘पांडगो इलो रे बा इलो!’ हे नाटक मच्छिंद्र कांबळी आणि सखाराम भावे यांच्या धमाल अभिनय जुगलबंदीमुळे आजही रसिकांच्या स्मरणात आहे. लेखक प्र. ल. मयेकर यांनी नोकरीपेशातून निवृत्त झालेल्या पुरुषांच्या व्यथावेदनांना फोडलेलं हे हास्यस्फोटक वाचारूप! वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ या गाजलेल्या नाटकाचं काहीसं विडंबनही त्यात आहे. भद्रकाली संस्थेनं मोजक्या प्रयोगांच्या नव्या लाटेत पुनश्च ते रंगभूमीवर आणलेलं आहे. मंगेश कदम यांनी ‘पांडगो’चा हा नवा अवतार बसवला आहे. कुठल्याही नाटकाचं पुनरुज्जीवन म्हटलं की आधीच्या प्रयोगाशी, त्यातल्या कलाकारांशी त्याची तुलना आलीच. तशात ‘पांडगो’सारख्या  मच्छिंद्र-सखाराम भावे या जोडगोळीनं आपली लखलखीत मुद्रा उमटवलेल्या नाटकाच्या बाबतीत तर ती स्वाभाविकच. पण सुखद आश्चर्याची बाब म्हणजे नव्या ‘पांडगो’मध्ये जुन्या प्रयोगातील काही गोष्टी गायब असल्या तरी जमेच्या नव्या अनेक गमतीजमती आहेत. त्यामुळे ‘पांडगो’चं हे नवं रूपही तितकंच फर्मास जमलेलं आहे. या प्रयोगात दिग्दर्शक मंगेश कदम यांच्या नव्या हाताळणीनं आपली कमाल दाखविली आहे. 

म्युन्शिपाल्टीतून रिटायर झालेल्या तात्या सावंतांची कमाई बंद झाल्याबरोबर त्यांचा घरातला भावही उतरतो. बायको, मुलगा, सून कुणीच त्यांना जुमानेनासे होतात. चहाच्या कपालादेखील ते महाग होतात. घरातल्या रामा गडय़ासारखी त्यांची अवस्था होते. त्यांनी काही मागितलं वा घरातल्या कुणाला काही ते सांगायला गेले, की जो-तो वस्सकन् त्यांच्या अंगावर येतो. ‘नटसम्राटा’तल्या आप्पासाहेबांसारखीच त्यांची अवस्था होते. आप्पासाहेबांची निदान बायको तरी त्यांचं दु:ख जाणते. मात्र, इथं काही सांगायला गेलं की तात्यांची ढालगज बायको काकू हीसुद्धा त्यांच्याकडे खाऊ की गिळू करून बघते. असं उपेक्षित आयुष्य कंठत असतानाच मुलगा तात्यांवर चोरीचा आळ घेतो. आता विडीकाडीसाठी त्यांनी दुसऱ्या कुणाकडे बघायचं? घेतले दहा-वीस रुपये पोराच्या खिशातून त्यांनी- तर कुठं बिघडलं? तशात मुलाच्या या चोरीच्या आरोपाला आपल्या बायकोचीही साथ.. म्हणताना तात्यांच्या सोशिकतेचा कडेलोट होतो. घराचं पुन्हा म्हणून तोंड पाह्य़चं नाही असा निर्धार करून ते घराबाहेर पडतात. घरच्यांना मात्र त्याचं काहीच वाटत नाही. जातील कुठं? पोटात आग पडली की येतील निमुट!
पण तात्यांचा निश्चय अढळ असतो. ते शिवाजी पार्कात सबंध दिवस कसाबसा काढतात. रात्र झाली तरीही घरी परतत नाहीत. पार्क निर्मनुष्य होतं. रात्र गहिरी होते. तात्यांच्या पोटात एव्हाना डोमकावळे ओरडायला लागलेले असतात. पण तरीही आता माघार नाही, यावर ते ठाम असतात. एवढय़ात कुणा एका अतृप्त पांडग्याचं भूत त्यांच्यापाशी येतं. तात्यांकरवी आपल्या अधुऱ्या राहिलेल्या इच्छा पुऱ्या करून घ्यायचा त्याचा बेत असतो. तात्या आधी त्याच्या भूतपणाची आणि नंतर त्याच्या चमत्कारी शक्तीची खातरजमा करून घेतात. आणि मग फक्त आपल्यालाच दिसू शकणाऱ्या या भुताकरवी आपण काय वाट्टेल ते करून घेऊ शकतो, हे कळल्यावर विजयी वीरासारखे ते घरी परततात. आता घरच्यांना दाखवतोच चांगला इंगा! मला छळतात काय!
घरी येताच तात्यांनी फर्मावल्यानुसार पांडग्याचं भूत घरातल्यांवर वचपा काढतं. घरात पाणी नसतं. पण चमत्कार करून पांडग्या घरातलं पिंप भरून देतो. अर्थातच शेजारी बोंबलत तात्यांच्या घरी येतात : आमचं भरलेलं पिंप अचानक खाली झालं, म्हणून! यावर भूताचं म्हणणं : मी काही देवबिव नाही. त्यामुळे मी नव्यानं काही निर्माण करू शकत नाही. फक्त इधर का माल उधर करू शकतो. भूताची ही ट्रिक तात्यांखेरीज इतर कुणाला कळणं शक्य नसतं. त्यामुळे तात्यांना अल्लाउद्दिनचा जादूचा दिवाच सापडतो जणू. ते मनात येईल ते पांडग्याला आदेश देतात. तात्यांच्या या नव्या आत्मविश्वासपूर्ण ‘अवतारा’नं घरातले चक्रावतात. त्यांना भूतबाधा वगैरे झालीय की काय, म्हणून काकूंच्या देवरुषी भावाला त्यांचं भूत उतरवायला बोलावतात. पण पांडग्या त्याचीच पळता भुई थोडी करतो. तेव्हा मात्र सर्वाचीच खात्री पटते, की तात्यांना कसलीतरी सिद्धी प्राप्त झालीय. त्यातून तात्यांना ‘तात्याबामहाराज’ बनवून त्यांना देवत्व प्राप्त झाल्याची खबर सगळीकडे पसरते. घरात भक्तांचा दरबार भरू लागतो. पांडग्याच्या जिवावर तात्या बुवाबाजी सुरू करतात.
परंतु ‘घी देखा, लेकीन बडगा नहीं देखा’ तसं होतं. यथावकाश पांडगो आपल्या तीन इच्छा पूर्ण करण्याच्या वचनाची तात्यांना आठवण करून देतो. पांडग्याच्या एकेक इच्छा ऐकल्यावर आयुष्यभर नाकासमोर चालणाऱ्या पापभीरू तात्यांना अक्षरश: घामच फुटतो. तथापि आता वेळ निघून गेलेली असते. पांडग्याचं भूत आपल्या इच्छा पूर्ण करून घेतल्याविना तात्यांना तसं सोडणार नसतं.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
maharashtrachi hasya jatra fame prasad khandekar writes letter
“प्रिय रसिक-मायबाप, मराठी चित्रपटसृष्टीला…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरची प्रेक्षकांना भावनिक साद, म्हणाला…
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

काय होतं मग..?
प्र. ल. मयेकरांनी अतिशय धम्माल अशी ही मालवणी कॉमेडी रचली आहे. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी तिला सादरीकरणाच्या नव्या शक्यतांची धूमशान फोडणी या प्रयोगाला दिली आहे. वरकरणी सरळमार्गी वाटणाऱ्या तात्यांच्या अंगी प्रत्यक्षात नाना कळा असतात. त्यात आणखीन वैभव मांगले ही भूमिका साकारत असल्यानं त्यांनी या पात्रास आपल्या हुशारीनं आणि हुन्नरीनं जास्तीचं परिमाणही दिलेलं आहे. मूळ मालवणी तात्या त्यांनी आपल्या सोयीनं थोडेसे बाणकोटी करून घेतले आहेत. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी ब्रेख्तच्या एलिनेशन तंत्राचा यात जाणीवपूर्वक वापर केला आहे. मधेच पात्रांनी भूमिकेबाहेर येऊन तंत्रज्ञांना सूचना करणं, तसंच लोकप्रिय गाण्यांचा विनोदनिर्मितीसाठी वापर अशा क्लृप्त्यांनी ‘पांडगो’ अधिकच खुमासदार झालं आहे. संहितेच्या पलीकडे जात त्यांनी प्रयोग अधिक रंगवण्यासाठी अनेक ‘बिटवीन दी गॅप्स’ शोधल्या आहेत आणि त्या मोठय़ा नजाकतीनं भरल्या आहेत. विशेषत: मूळ संहितेतील पांडग्याचं भूत नव्या प्रयोगात भलतंच रंगीतसंगीत झालेलं आहे. सगळ्या पात्रांच्या स्वभावविभावाचा दिग्दर्शकानं बारकाईनं विचार केल्याचं जाणवतं. त्यातून विनोदाच्या अनेक जागा त्यांना सापडल्या आहेत. पात्रनिवडीत त्यांनी अर्धी बाजी मारलेली आहेच.
अंकुश कांबळी यांनी गिरणगावातल्या चाळीचं नेपथ्य हुबेहुब साकारलं आहे. चाळीतल्या वातावरणाचा कल्ला अशोक पत्कींनी संगीतात अचूक पकडला आहे. नाटकाच्या धूमशानीत त्यांच्या पाश्र्वसंगीताचा वाटा मोलाचा आहे. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेतून नाटय़पूर्ण क्षण गहिरे केलेत. गीता गोडबोले यांच्या वेशभूषेनं पात्रांना वास्तवदर्शी व्यक्तित्व दिलं आहे.
वैभव मांगले यांनी तात्यांची भूमिका स्वत:ही धमाल एन्जॉय केली आहे. त्यांचं रंगमंचावरचं बागडणं मिच्छद्र कांबळींच्या सहज वावराची आठवण करून देतं. विनोदाच्या वायच् वायच् बारीक बारीक जागाही त्यांनी अप्रतिम काढल्या आहेत. मधेच भूमिकेबाहेर येऊन ते तंत्रज्ञांना सूचना देतात तेव्हा तर प्रेक्षक हसून हसून गडाबडा लोळायचेच बाकी उरतात. सोबतीला त्यांचा विनोदी अभिनेत्याचा स्मार्टनेस आहेच. चिन्मय मांडलेकर यांनी गंभीर अभिनेत्याच्या आपल्या इमेजबाहेर पडण्यासाठीच बहुधा पांडग्या भूताची भूमिका स्वीकारलेली दिसते. सखाराम भावेंपेक्षा त्यांनी या भूताला एक वेगळीच खुमारी दिली आहे. हसरं, खेळकर, आधुनिक ढंगातलं हे भूत आपलंसं वाटतं. लीना भागवत यांनीही ढालगज काकूचा ठसका उत्तम दाखवला आहे. कुशल बद्रिकेंचा धांदरट विठोबाही लक्षवेधी. अंशुमन विचारे यांनी गल्लीतला गुंड बाबी त्याच्या टेररसह साकारला आहे. भारत गणेशपुरे यांचा खातू फक्कड. गणेश रेवडेकर (दादा भगत), प्रभाकर मोरे (हवालदार), सुकन्या काळण (लावणी नृत्यांगना), शशिकांत केरकर (तात्यांचा मुलगा) आणि गौरी सुखटणकर (सून) यांनीही उत्तम साथ दिली आहे.
नव्या रूपातलं ‘पांडगो’ जुन्यापेक्षा वेगळं आणि आणखीनच धूमशानी आहे यात संशय नाही.

 

Story img Loader