रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरातील लोकांची नाळ ज्या गोष्टींशी जोडली गेली आहे ती गोष्ट पडद्यावर रंगवायचं आव्हान घेतल्यानंतर मी म्हणतो तेच आणि तितकंच खरं.. या हट्टाने केली तर जो काही भयंकर परिणाम कलाकृतीच्या रूपात उतरतो त्याची प्रचीती सध्या ‘आदिपुरुष’च्या निमित्ताने प्रेक्षकांनी घेतली आहे. दिग्दर्शक ओम राऊतकृत हे नवं ‘राघवायन’ म्हणजे कुठल्याही अर्थाने ‘रामायण’ या महाकाव्याचं पडद्यावरचं चित्रण ठरत नाही. रामायणातील घटनांना हॉलीवूडी मालिका-चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि व्हीएफएक्सचा मुलामा देऊन केलेला ‘आदिपुरुष’ ही भयंकर काल्पनिक आवृत्ती कोणाच्याही पचनी पडणारी नाही.

‘तानाजी’ चित्रपटाच्या यशामुळे दिग्दर्शक म्हणून ओम राऊत यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. त्यातही ज्या देशात प्रभू रामचंद्राची गोष्ट ऐकतच पिढय़ान् पिढय़ा लहानाच्या मोठया झाल्या आहेत त्यांच्यासाठी ‘रामायण’ रूपात पडद्यावर पाहता येणं यासारखी पर्वणी नाही. त्यामुळे लाखो लोकांच्या भावनांशी जोडली गेलेली कथा तंत्राच्या साहाय्याने पडद्यावर आणताना त्याचा खेळखंडोबा होणार नाही याचं किमान भान इथे लेखक-दिग्दर्शक-तंत्रज्ञ सगळय़ाच मंडळींनी ठेवायला हवं होतं. ‘रामायण’ तीन तासांत पडद्यावर मांडणं अवघड आहे हेही मान्य.. पण म्हणून अगदीच दोन-तीन घटनांवर लक्ष केंद्रित करत चित्रपटाचा खेळ मांडण्यातही काहीच हशील नाही. चित्रपटाच्या सुरुवातीलाच राघव-जानकी आणि शेष (श्रीराम, सीता आणि लक्ष्मण नव्हेत) यांची चित्रे डोळय़ासमोर येतात. या चित्रांमधून आणि त्याच्या मागे सुरू असलेल्या निवेदनातून कैकेयीने दशरथ राजाकडे केलेली मागणी, वडिलांचा आदेश मानून तिघेही वनवासात निघाले आहेत आणि राघवाची भरतभेट या तीन गोष्टी भराभर मागे टाकत आपण थेट वनवासात पोहोचतो. इथे पहिली भेट जानकी आणि शेष यांच्याशी होते. शेष माव्र्हलच्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एक आधुनिक डिजिटल सुरक्षा कवच जानकीसाठी गुहेबाहेर निर्माण करतो. मग राघवाच्या प्रवेशासाठी म्हणून जो असुरांचा थवा पडद्यावर येतो त्यांच्या कवटीधारी नायकाला पाहिलं की पुन्हा ‘अॅव्हेंजर्स’मधील रेड स्कलची आठवण होते. रावणाने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतल्यानंतर त्याच्यापाठोपाठ आपणही त्या व्हीएफएक्सच्या आधारे केलेल्या काळय़ा-काळय़ा आणि मधूनच एखादी सोन्याची तार फिरवल्यासारखी रचना असलेल्या रावणाच्या (कधीकाळी सोन्याची असलेल्या) लंकेत शिरतो. रावणाची लंका, त्याची अंतर्बाह्य रचना, रावणाचे सैन्य हे सगळं एकेक समोर येत गेलं की ‘गेम ऑफ थ्रोन’, ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ सारख्या हॉलीवूड वेबपटातून पाहिलेल्या असंख्य व्यक्तिरेखा आणि तपशील आपल्याला आठवत राहतात. पहिल्याच फ्रेमपासून आपण ज्या गोष्टीशी हे आपलं नाही आहे.. असं म्हणत जोडलेच जाऊ शकत नाही तो चित्रपट तीन तास बसून पाहणं हे अवघड प्रकरण आहे.

मुळात चित्रपट रामायणावर आधारित आहे. श्रीराम आणि सीतेची कथा यात पाहायला मिळणार आहे. रावणाने सीतेचे केलेले अपहरण आणि रामाने दशानन रावणाचा वध करून मिळवलेला विजय या दोनच घटनांवर चित्रपट आधारला आहे हेही ठीक आहे. तरीही चित्रपटात एकदाही ‘राम’ नाम कोणाच्याही मुखी नाही. पार्श्वभूमीवर राम सिया राम.. या गाण्याचा जयघोष वाजत असतो, मात्र कुठेही कोणीही राम अशी हाक मारत नाही. सगळीकडे राघव आणि जानकी हाच उल्लेख करण्यात आला आहे. ज्याच्यावर चित्रपट करायचा आहे त्याचं मूळ नावच नको.. या हट्टामागचे कारण लक्षात येत नाही. व्यक्तिरेखा, स्थळ-काळानुसार चित्रण या दोन्ही गोष्टींचं जिथे भान ठेवण्यात आलेलं नाही तिथे हनुमानाच्या तोंडी ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..’ सारखे वाह्यात संवाद असतील तर खरं नवल वाटायला नको. मनोज मुंताशिरसारखा उत्तम गीतकार इथे लेखक म्हणून आहे, व्हीएफएक्सची जबाबदारी प्रसाद सुतार यांच्यासारख्या अनुभवी माणसाकडे होती आणि तरीही या चित्रपटाचा अद्भुत खेळखंडोबा झाला आहे. प्रभास आणि सैफ अली खान हे दोनच कलाकार इथे प्रामुख्याने दिसतात. त्यांच्या अभिनयाबद्दल चर्चा करण्यासारखीही गोष्ट नाही. त्याचं सगळय़ात महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटातील जवळपास सगळय़ा मुख्य व्यक्तिरेखा एकमेकांबरोबर मुक्याने वावरल्या आहेत. एखाद-दोन वाक्य वगळता बाकी शांतता.. आणि मागे वाजणारं गाणं यापलीकडे राघव आणि शेष या दोन भावांमध्ये संवाद होत नाही, राघव – जानकीवर दोन गाणी प्रेमभावना दाखवण्यासाठी आहेत बाकी काहीच नाही. अनेकदा हा चित्रपट रामाची कथा सांगतो की फक्त रावणावरच लक्ष केंद्रित करायचं होतं हाही गोंधळ आहे. कारण जवळपास अध्र्याहून अधिक व्हीएफएक्स आणि चित्रपटाचं फुटेज रावणाचं चालणं-बोलणं, त्याची विचित्र लंका, शंकराच्या महाकाय पिंडीसमोर त्याचं वादन या असल्या गोष्टींवरच वाया गेलं आहे. गाणीही लक्षात राहण्यासारखी नाहीत. त्यामुळे तीन तास आपण रामायण म्हणून काय पाहात आहोत? किंबहुना का पाहात आहोत? हा प्रश्न अधिक छळतो. चित्रपट फसू शकतात, तांत्रिक-अभिनयातील चुकाही असू शकतात. मात्र इथे मुळातच चुकीच्या कथाकल्पनेतून ‘आदिपुरुष’ नावाने जे काही ‘राघवायन’ उभं राहिलं आहे ते अत्यंत फसवं आहे.

आदिपुरुष

दिग्दर्शक – ओम राऊत
कलाकार – प्रभास, क्रिती सनन, सनी सिंग, सैफ अली खान, तेजस्विनी पंडित, देवदत्त नागे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A terrifying fantasy version of adipurush with characters from serials and vfx amy