जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या ‘धडक’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. येत्या २० जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘धडक’ हा सिनेमा मराठीतील सुपरहिट ठरलेला सिनेमा ‘सैराट’ याचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी आणि इशान यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार असून चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जान्हवी आणि इशानला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटामुळे सगळीकडे जान्हवीची चर्चा सुरु असून सध्या ती एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लाडकी लेक ‘धडक’ या चित्रपटातून पहिल्यांदाच सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. मात्र त्यापूर्वीच ती सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहत आली आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर ती प्रचंड प्रकाशझोतात आली होती. मात्र सध्या ती एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. जान्हवीने एक व्हिडिओ शेअर केला असून ती ‘इश्कजादे’ या सिनेमातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नसमारंभातील असून ती अर्जुन कपूर आणि परिनिती चोपडा यांच्या ‘झल्ला वल्ला’ या गाण्यावर डान्स करत आहे. या डान्समुळे तिच्यातील हा सुप्त गुण दिसत असून ती उत्तम प्रकारे डान्स करत आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर लाईक्सचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जान्हवी तिच्या कुटुंबियांबरोबर लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. सुट्ट्यांवरुन परतल्यानंतर ती लवकरच धडकच्या प्रमोशनच्या कामाला लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.