उद्योगनगरीच्या राजकीय आखाडय़ात

एखाद्या कार्यक्रमाची लोकप्रियता ‘कॅश’ करून घेण्याची शक्कल राजकारण्यांना नवीन नाही. उद्योगनगरीतील तापलेल्या राजकीय आखाडय़ात उतरू पाहणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांनी मतांचा जोगवा मागण्यापूर्वी वातावरणनिर्मिती करण्यासाठी कलावंतांच्या लोकप्रियतेचा आधार घेतला आहे. ‘झी मराठी’वरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ टीमचे कलावंत आणि ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे सूत्रसंवादक आदेश बांदेकर ऊर्फ भावोजी यांना सर्वाधिक पसंती उद्योगनगरीत मिळते आहे. या दोन कार्यक्रमांची चलती असून हजारोंच्या संख्येने नागरिक या कार्यक्रमांचा आनंद लुटत आहेत. गर्दीमुळे उमेदवाराच्या खात्यात किती मते जमा होतील, हे मात्र सांगणे कठीण आहे.

‘झी मराठी’वर लोकप्रिय ठरलेल्या ‘होम मिनिस्टर’च्या ‘आदेश भावोजीं’चे सर्वाना आकर्षण आहे. राज्याच्या विविध भागात शेकडो कुटुंबीयांशी घरोबा निर्माण केलेले बांदेकर थेट आपल्या गावात व आपण राहतो, त्या परिसरात येत असल्याने नागरिकांची विषेशत: महिलांची तुडुंब गर्दी त्यांच्या कार्यक्रमांना होत आहे. महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी ‘आदेश भावोजीं’च्या लोकप्रियतेचा आधार घेतला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पैठणीचे कार्यक्रम होत आहेत व त्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभत आहे. खासदार श्रीरंग बारणे व नगरसेवक नीलेश बारणे यांनी थेरगावात, शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी वाकडमध्ये, पालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे यांनी निगडी-यमुनानगरमध्ये, नव्याने शिवसेनेत दाखल झालेल्या राजेश वाबळे यांनी संत तुकारामनगरमध्ये, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे यांनी चिंचवडगावात तसेच दापोडी, चिखली, जाधववाडी या भागातील सेना पदाधिकाऱ्यांनी ‘आदेश भावोजीं’ना आमंत्रित केले होते. आणखी काही जणांच्या कार्यक्रम पत्रिकेवर बांदेकरांचे कार्यक्रम नियोजित आहेत.

दुसरीकडे, ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने पिंपरी-चिंचवड शहरातच कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे यांचा धुमाकूळ प्रत्यक्षातही अनुभवण्यासाठी गावोगावी गर्दीचा कहर होत आहे. या सीझनमध्ये पै. विजय गावडे यांनी या ‘हवा’च्या टीमला चिंचवडला सर्वप्रथम पाचारण केले. त्यानंतर, मोशीत नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी, रावेत येथे माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांनी, पिंपळे सौदागर येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी, पिंपळे निलखला तुषार कामठे यांनी, सांगवीत हर्षल ढोरे यांनी या कार्यक्रमाद्वारे जोरदार वातावरणनिर्मिती केली. आणखी बऱ्याच उमेदवारांनी या कलाकारांशी संपर्क साधला आहे. अवाच्या सवा मानधन आणि कार्यक्रमासाठी होणारा खर्च कितीही जास्त असला तरी या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहून इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात, या गर्दीचा मतदान म्हणून कितपत उपयोग होईल, याविषयी कोणालाही खात्री नाही.

Story img Loader