स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण टीम एकत्र एका छताखाली आहे. मालिकेच्या निमित्ताने एक छान कुटुंब तयार झालं आहे. त्यामुळे शूटिंगसोबतच सकाळच्या नाश्ता, जेवणापासून ते अगदी व्यायामापर्यंत सर्व काही ठरवून एकजुटीने केलं जातंय.
या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच रुपाली भोसले फिटनेसकडे कायम लक्ष देताना दिसते. सेटवर देखील इतर सहकार्यांना सोबत घेऊन व्यायाम करतेय. रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. “सेटवर मी, अपूर्वा गोरे आणि गौरी कुलकर्णी म्हणजेच मालिकेतली इशा आणि गौरी आम्ही तिघी न चुकता व्यायाम करतो. योगाच्या आसनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात तासभर चालणं हे आमचं नित्याचं आहे. शूटिंग संपलं की आम्ही सर्व एकत्र डिनर करतो. त्यानंतर वॉक हा ठरलेला. शूटिंगमधूनही वेळ काढत हॉटेलच्या रुममध्ये आम्ही ठरवून व्यायाम करतो.” असं ती म्हणाली.
View this post on Instagram
आणखी वाचा: समंथाला होणाऱ्या विरोधामुळे सासरे नागार्जुन चिंतेत; ‘द फॅमिली मॅन 2’ला तामिळनाडूत विरोध
मी स्वत:साठी १ तास तरी काढते.
पुढे रुपाली म्हणाली, “लॉकडाऊनमुळे सध्या जिम वैगेरेचा पर्याय नसल्यामुळे उपलब्ध गोष्टींचा सदुपयोग करण्याचा माझा प्रयत्न असतो. दिवसभराच्या गडबडीतून मी स्वत:साठी १ तास तरी काढते. सध्या सेटवर खूपच आल्हाददायक वातावरण आहे. सेटच्या आजूबाजूला खूप झाडं आहेत. त्यामुळे मोकळी हवा आम्ही अनुभवतोय. सध्याच्या घडील ऑक्सिजनचं महत्त्व आपल्या सर्वांनाच कळतं आहे. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने ही हिरवाई अनुभवायला मिळतेय याचा आनंद आहे. आम्हा सर्वांच्या डाएटचीही सेटवर काळजी घेतली जातेय. माझं प्रत्येकालाच एक आवाहन आहे की तुम्हीसुद्धा स्वत:च्या आरोग्यासाठी योग्य डाएट आणि व्यायाम याची साथ घेतली तर उत्तम जीवनशैली अनुभवू शकाल.” असं म्हणत रुपालीने चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.