स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत आईचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही कायमच चर्चेत असते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मधुराणी प्रभुलकर हिचे पती आणि दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांची फसवणूक झाल्याचे वृत्त नुकतंच समोर आलं होतं. ऑनलाईन माध्यमातून हॉटेल बुकींग करताना ही फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणानंतर प्रमोद प्रभुलकर यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणावर मधुराणी प्रभुलकरने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध विषयांवर भाष्य करत असते. नुकतंच तिने पतीबरोबर घडलेल्या फसवणुकीच्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि पैसे परत मिळायला हवेत, अशी मागणी तिने केली आहे.
आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते…’ फेम मधुराणी प्रभुलकरच्या पतीची फसवणूक, हजारोंचा गंडा
मधुराणी प्रभुलकरची इन्स्टाग्राम पोस्ट
“नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडिया वर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे.
काल पासून ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ‘ ‘ मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक ‘ , अशा बातम्या काही वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत. पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही.माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन .
गणपतीपुळ्यातील हॉटेल मध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल ह्या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत. त्यांच्या प्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. ह्याचा लवकरात लवकर तपास लगायला हवा. आणि ह्या सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत.
मला आज सकाळासून शेकडो मेसेजेस व फोन येत आहेत. पत्रकारांनी नीट माहिती न घेता केवळ माझ्या नावाचा वापर करून हेड लाईन छापली आहे. ह्या बेजबाबदारपणाचा खेद आणि निषेध”, अशी पोस्ट मधुराणी प्रभुलकरने केली आहे.
दरम्यान तिच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अनेकांनी आम्ही मालिकेत तुम्हाला मिस करतोय, अशी कमेंट केली आहे. हो मी आताच बातमी वाचली.. पण तुमच्या पोस्ट मुळे खर काय ते कळलं आहे.. लवकर या मालिके मधे आम्ही वाट पाहतोय, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.