छोट्या पडद्यावरील सध्याच्या अतिशय लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील सर्वच पात्र कायम चर्चेत असताता. आता मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने ‘अप्पा’ म्हणजे मालिकेतील त्याच्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने खऱ्या आयुष्यात आप्पा म्हणजेच किशोर महाबोले यांना वडिलांच्या निधनबद्दल माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी शूटिंग पूर्ण केले असे म्हटले आहे.
मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर किशोर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी, ‘माझी आणि आप्पांची भूमिका करणारे किशोर महाबोले यांची ओळख आई कुठे काय करतेच्या सेटवरच झाली. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं. अतिशय शांत आणि हसमुख स्वभाव. पण एकदा जर तार सटकली मग कोणाच्या बापाला ते ऐकत नाहीत. या दीड वर्षांमध्ये एकदा दोनदाच सटकली होती आणि क्षणात शांत ही झाले.’
आणखी वाचा : ऐश्वर्य ठाकरे आणि लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर पूजा बेदीचे वक्तव्य, म्हणाली…
View this post on Instagram
पुढे ते म्हणाले, ‘या करोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्रच सिरीयलचं शूटिंग करतो आहोत. लॉकडाउनमध्येही शूटिंग चालू होतं खूप धैर्याने आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत काम चालू ठेवलं. दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं जेव्हा ही बातमी त्यांना कळाली तेव्हा आमचा एक मिस्कील असा सीन सुरू होता. बातमी ऐकून ते हादरून गेले. आमचे डायरेक्टर रवी करमरकर यांनी आप्पांना ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितलं. आप्पा म्हणाले सीन पूर्ण करतो. मग निघतो. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही. आपल्या वडिलांची अशी बातमी कळल्यानंतर कलाकार ते सगळं दुःख आतमध्ये ठेवून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून एक मिश्किल सीन करतो. मनामध्ये वादळ असताना अभिनय करायचा की आपण शांत आहोत, आनंदी आहोत. तो सीन केला त्यांनी आणि मग ते निघाले.’