मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून राधिका देशपांडेला ओळखले जाते. राधिका ही स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या मैत्रिणीचे म्हणजे देविकाचे पात्र साकारत आहे. राधिकाने काही दिवसांपूर्वी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळत नसल्याबद्दल आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर संताप व्यक्त केला होता. आता तिने याबद्दलच पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राधिका देशपांडे ही सध्या ‘सियावर रामचंद्र की जय या बाल-महानाट्य’ प्रयोगात व्यस्त आहे. या बालनाट्य शिबिरासाठी राधिकाने शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत होती. पण कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर तिला शासनाचा हॉल मिळाला असून त्याबद्दल तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही”, मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हणाली “नाकावरची माशी…”

राधिका देशपांडेची पोस्ट

“चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ.”
“सियावर रामचंद्र की जय”

मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध.

मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, “मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.” तसेच घडले.

ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे. “देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है”, असं मला दिसतं आहे.

पार्श्वभूमी अशी की मी बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत होते. सरकार वर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला. आणि सरकार कडून त्वरित कारवाई सुरू झाली. चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसली ही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथ जी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्या पर्यंत पोहोचली. यंत्रणा हलली. आम्हाला हॉल मिळाला, आम्ही नाटक सादर केलं. एक प्रभु श्रीराम आमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही त्याचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करून दिलात. लहान मुलांसमोर एक उदाहरण ठरलात. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. “एक नाथ कसा असावा तर असा!” धन्यवाद.

अतिथी म्हणून आलेल्यांसाठी आमच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची आरास आहे आणि आम्ही झालर बनून उभे आहोत आशेने पहात. धन्यवाद. २ माणसं वाईट भेटली पण ४ चांगली माणसं ही भेटली आम्हाला! विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे मंजुश्री ताई खर्डेकर, संदीप खर्डेकर, सचिन पाषाणकर, किरण साळी, राहुल सर. धन्यवाद.

“चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ची कहाणी “चार हात, दोन फोन, एक नाथ” पर्यंत सुफळ संपन्न. बोलो “सियावर रामचंद्र की जय”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान या पोस्टबरोबरच राधिकाने एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत काही बालकलाकार, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर नेतेमंडळी दिसत आहेत. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte serial devika fame actress radhika deshpande thanks to cm eknath shinde share post nrp