छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मालिकेत नवे रंजक वळण आले. संजना आणि अनिरुद्ध लग्नबंधनात अडकले. त्यापाठोपाठ आता एका नव्या बालकलाकाराची मालिकेत एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच संजना आणि अनिरुद्ध विवाहबंधनात अडकले. अनेक अडचणींनंतर संजना आणि अनिरुद्ध एकत्र आले आहे. अप्पांनी घराचा अर्धा हिस्सा अरुंधतीच्या नावावर केल्यामुळे अरुंधती देखील देशमुख कुटुंबीयांसोबत राहताना दिसत आहेत. संजनामुळे घरात सतत वाद होत असतात. दरम्यान आता मालिकेत नवे वळण आले आहे.
View this post on Instagram
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजनाच्या मुलाची एण्ट्री झाल्याचे पाहायला मिळते. निखिल हा संजना आणि शेखरचा मुलगा आहे. शेखर काही दिवसांसाठी निखिलला संजनाकडे आणून सोडतो. आता निखिलमुळे संजना आणि अनिरुद्धच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.