‘घरोघरी मातीच्याच चुली’ ही म्हण सासू-सून संबंधांत सर्वच काळांत लागू पडते. माणसाचं राहणीमान आणि विचार काळाबरोबर कितीही बदलले तरीही या नात्यात मात्र का कुणास ठाऊक, फारसा फरक पडलेला नाही. उलट, आज व्यक्तिकेंद्री जगण्याचा तकाजा वाढल्यानं तर ‘कालचा गोंधळ बरा होता’ म्हणायची वेळ आली आहे. पूर्वी निदान लोकलज्जेस्तव तोंडदेखलं का होईना, सासूशी सुनेला बरं वागावं लागे. आज तेही करण्याची आवश्यकता आपलं स्वातंत्र्य (प्रायव्हसी) कसोशीनं जपणाऱ्या स्वकेंद्री सुनांना वाटत नाही. मुलाला सांभाळायला सासूची गरज पडली तरच नाइलाजानं तिच्याशी काही अंशी जुळवून घेतलं जातं. त्यातही मूल सांभाळायला स्वत:ची आई असेल तर सासू ही अडगळच वाटते त्यांना. हे काहीसं ‘जनरल’ विधान वाटत असलं तरी बहुतांशी सत्य आहे, हे चौकस नजरेनं सभोवती पाहिल्यास कुणालाही आढळून येईल. किंवा, खुद्द आपल्या घरात जरी डोकावलं, तरी याचा प्रत्यय येईल. सासू-सून संबंधांतले पारंपरिक तिढे जसे त्याला कारणीभूत आहेत, तशीच फ्रॉइडियन थिअरीही! तशात हल्ली जागतिकीकरणानंतर आमूलाग्र बदललेल्या वातावरणात माणसं अति व्यक्तिकेंद्री झाल्यानं अधिकच भर पडलीय. माणसाचं माणूसपण हिरावून घेणारी सद्य:परिस्थितीही त्यास कारण आहे. अर्थात यास अपवादही आहेत. परंतु ते नियम सिद्ध करण्यासाठीच! त्यामुळे आज सासू-सून संबंधांवर नवं काही लिहिलं वा दाखवलं जाईल हे संभवत नाही. असं असताही सासू-सून संबंधांवरचंच ‘आई, तुला मी कुठे ठेवू?’ हे नवं नाटक रंगभूमीवर आलं आहे.
अशोक पाटोळेलिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकाच्या नावात जरी सकारात्मकता असली तरी प्रत्यक्ष नाटकात ती बिलकूल नाहीए. पाटोळेंच्या आजवरच्या नाटय़लेखनाचा प्रवास जवळून पाहणाऱ्यांना एक गोष्ट निश्चितच माहितीय, की त्यांची कथाबीजं चमकदार असतात. त्यामुळे या नाटकाला तीच अपेक्षा घेऊन आपण जातो. परंतु काळ्या-पांढऱ्या रंगांत रंगवलेली यातली पात्रं बघून पदरी निराशा येते. म्हणजे वास्तवात अशी माणसं नसतातच असं नाही; परंतु इतक्या उघडपणे ती पाशवी वागत नाहीत. कदाचित पाटोळ्यांना टोकाचा मेलोड्रामा घडवायचा असल्याने त्यांनी अशी पात्रं योजली असावीत. यात दाखविलेल्या दोन सुना सासूशी इतक्या खलनायकी ढंगात वागतात, की त्यांच्यापुढे हिंदी चित्रपटांतल्या व्हॅम्पही सोबर वाटाव्यात. म्हणजे सासूला घालूनपाडून बोलण्यापासून ते तिच्या जिवावर उठण्यापर्यंत चक्क त्यांची मजल जाते. आणि त्यांचे शेमळट नवरे हे मुकाटपणे बघत राहतात. त्यात धाकटय़ा धवलला तर आईशी काहीच देणंघेणं असलेलं दिसत नाही. बायकोच्या बैलावत त्याचा एकूण व्यवहार आहे. त्याची बायको कोमल सासूला कायम हिडिसफिडिस करते. थोरल्या पवनला आपल्या बायकोनं (नयन) आईशी वाईट वागू नये असं (किंचित) वाटत असलं तरी तो तिला त्याबद्दल झापत नाही. खरं तर कोमलनं सासूला दहा र्वष आपल्याकडे सांभाळलं ते आपल्या मुलाचं करण्यासाठी. पण तो आता मोठा झाल्यानं तिची गरज संपलीय. म्हणून मग एके दिवशी कोमल सासूला घेऊन चक्क थोरल्या दिराकडे.. पवनकडे आणून टाकते. नयनला तर सासू ही नस्ती ब्यादच वाटत असते. त्यामुळे सासू घरात आल्या क्षणापासूनच ‘आईला पुन्हा धवलकडे पाठवून दे’ म्हणून ती पवनचा पिच्छा पुरवते. परंतु कोमलला आता काही झालं तरी सासू आपल्या घरात नको असते. दोघीही सासूची बला एक-दुसरीच्या गळ्यात टाकण्यासाठी जंग जंग पछाडतात. तेव्हा सासूबाईही त्या दोघींना त्यांचं एकमेकांबद्दलचं खरं मत काय आहे, हे सांगते तेव्हा दोघी तिच्या अंगावर धावून जातात. तिचा गळा घोटू बघतात.
..पण एके दिवशी अकस्मात परिस्थिती पालटते. विधवा सासूला सासऱ्यांच्या ऑफिसकडून त्यांच्या कार्यकौशल्याबद्दल ५० कोटी रुपये बोनस स्वरूपात मिळणार असल्याची वार्ता दोघींना कळते. आणि मग त्या पालटतात. सासूबाईंना लाडे लाडे जवळ करू पाहतात. परंतु आता सासूबाई ठामपणे त्यांना सुनावतात. त्यांच्या कसाबकरणीची शिक्षा म्हणून त्या दोघींना आपल्या उजव्या हाताचे अंगठे तोडून द्यायला सांगतात. बायकोबद्दलच्या आईच्या तक्रारींकडे आधी दुर्लक्ष करणारे पवन व धवलही आता आपल्या बायकांना दमात घेतात. आईच्या सांगण्याप्रमाणे अंगठे तोडून द्यायला सांगतात. कारण प्रश्न ५० कोटींचा असतो ना! पण पन्नास कोटीसाठी अंगठा तोडून द्यायचा म्हणजे..? दोघींना अंगठा तर द्यायचा नाहीए, परंतु ५० कोटी मात्र त्यांना हवे आहेत! पण सासूबाई हट्टालाच पेटलेल्या.. अंगठा दिलात तरच संपत्तीत वाटा मिळेल!
शेवटी काय घडतं, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य.
लेखक अशोक पाटोळे यांनी सासू-सुनांतील सनातन समस्याच यात मांडली आहे. अर्थात काळ्या-पांढऱ्या रंगांच्या पात्रांकरवी! त्यानं नाटकात नाटय़पूर्णता आली असली, तरीही हे सगळं बेतीव आहे हे कळत असल्यानं प्रेक्षक म्हणून आपण त्यात गुंतून जात नाही. बऱ्याचदा तर या बेतलेपणाची कींवच येते. खरं म्हणजे नाटक पाहायला येणारा प्रेक्षक हा पदरचे पैसे मोजून स्वत:ला राजीखुशीनं फसवून घ्यायला आलेला असतो. त्याची जर चांगल्या अर्थी फसवणूक होत नसेल तर ते नाटकाचं अपयशच म्हणायला हवं. ‘आई, तुला मी कुठे ठेवू?’चा हा प्रॉब्लेम आहे. यातल्या सुना इतक्या ओवाळून टाकलेल्या आहेत, की पूछो मत! त्यांचे नवरेही बायकोचे बैल. राहता राहिली सासू. ती तेवढी हाडामांसाची ‘माणूस’ आहे. नाटकातील पात्रांच्या वर्तनाला कार्यकारणभाव लागतो. तो तर्कानं जरी गृहीत धरता आला, तरी परिस्थिती पालटल्यावर माणसं बदलतात.. वेगळी वागतात. पण इथं तसं होत नाही. दोन्ही सुना आणि त्यांचे नवरे इतके निर्लज्ज व आपमतलबी आहेत, की त्यांना त्यांच्या आईनं क्षमा करावी, या लायकीचेच ते नाहीत. अशांना अखेरीस पश्चाताप झाल्याचं दाखवून नाटककर्त्यांनी काय साधलं, त्यांचं त्यांनाच ठाऊक. नाटकाचा शेवट गोड करण्याची ही सक्ती का? जी माणसं मूलत: कसाई वृत्तीचीच आहेत, त्यांना असा पश्चाताप होईल? तसा तो खरोखरीच व्हायचा असता तर आईच्या नावे प्रचंड मालमत्ता आहे हे कळल्यावर तरी तो नक्कीच झाला असता. पण नाटकात असं दाखवलेलं नाही. त्यानंतरही ही सगळी मंडळी तिच्याशी ज्या प्रकारे वागतात तो लांडगेपणाचा भयंकर नमुना आहे. थोडक्यात, बेतलेलं हे नाटक काही क्षण प्रेक्षकांच्या मनात प्रक्षोभ निर्माण करीत असलं तरी चांगलं नाटक पाहिल्याचं समाधान देत नाही, निश्चित.
दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी संहितेतल्या या त्रुटी व दोष लेखकाच्या लक्षात आणून देणं अपेक्षित होतं. केवळ पात्रांच्या नाटय़पूर्ण व्यवहारांवर सबंध नाटक तोललं जाऊ शकत नाही. त्यासाठी संहितेत दम असावा लागतो. हा एक मेलोड्रामा अाहे हे मान्य केलं तरी यातली पात्रं ‘माणूस’ निश्चितच नाहीत. अगदी आजच्या व्यक्तिकेंद्री जगण्यातही माणसं ‘पोलिटिकली करेक्ट’ वागत असल्याचा देखावा तरी निर्माण करतात. यातली यच्चयावत पात्रं पशुवत दाखविली आहेत. नाटककर्त्यांना तसं दाखवायचं असेल तर त्यांनी जरूर दाखवावं. परंतु मग त्यांना शेवटी नक्राश्रू ढाळत पश्चाताप झाल्याचं दाखवायची गरज काय? असो. हे सगळं गोंधळीच आहे. दिग्दर्शकानं संहितेबरहुकूम नाटक बसवलं आहे. नाटकातली पात्रं त्यांनी लेखकाला अभिप्रेत आहेत तशीच ‘जिवंत’ केली आहेत. त्यांच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात मनस्वी चीड निर्माण होते यात त्यांचे यश आहे. नाटकाचं नेपथ्य, संगीत व प्रकाशयोजनेची धुराही पुरुषोत्तम बेर्डे यांनीच सांभाळली आहे. अनिल भंडारे यांची रंगभूषा व श्रोणवी खामकर यांच्या वेशभूषेनं पात्रांना व्यक्तित्व दिलं आहे.  
यात आई झालेल्या रोहिणी हट्टंगडी यांनी मुलं आणि सुनांकडून मिळणाऱ्या भीषण वागणुकीनं होणारी घुसमट, कमालीची उद्विग्नता, हतबलता अतिशय संयमितपणे, परंतु आवश्यक त्या टोकदार पद्धतीनं दाखविली आहे. नवऱ्यानं मागे ठेवलेल्या  संपत्तीचा आधार मिळाल्यावर मात्र त्या खंबीरपणे प्राप्त परिस्थितीला सामोऱ्या जातात. व्हॅम्प सुनांना आणि आपल्या बैल मुलांना त्यांची योग्य ती जागा दाखवितात. याउप्पर स्वत:चं आयुष्य सावरण्याबरोबरच आपल्यासारख्याच पिचलेल्या आई-वडिलांसाठी विसाव्याचं, आपुलकीचं ठिकाण निर्माण करण्याचा निर्धार करून घर सोडतात. योगिनी चौक यांनी स्वार्थाधतेचा अर्क असलेली उलटय़ा काळजाची कोमल तितक्याच निष्ठुरतेनं साकारली आहे. तिचा भावनाशून्य नवरा धवल- सिद्धेश शेलार यांनी तेवढय़ाच कोरडेपणी उभा केला आहे. रूपेश पाटोळे यांनी मात्र ज्याला किंचित माणुसकी असावी असा संशय यावा असा पवन ठीकठाक वठवला आहे. अंगावरून झुरळ झटकावं तसं सासूला झटकू पाहणारी नयन, सुरभि भावे यांनी तितक्याच तिरस्कृत रीतीनं पेश केली आहे. मंदा देसाई (मम्मी) आणि विद्याधर जोशी (डॉक्टर व कारखानीस) हेही यात काम करतात.
– रवींद्र पाथरे

Story img Loader