अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आले. त्यामुळे कलाविश्वामध्ये आलियाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे तिच्या पहिल्या चित्रपटात ती अभिनेता सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात आलिया सैफच्या मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे.
अद्याप तरी या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही. मात्र चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी ती प्रचंड उत्सुक असल्याचं तिने सांगितलं.
“यंदाचं वर्ष माझ्यासाठी खास आहे. मी पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. केवळ मीच नाही तर माझ्यासोबत अनन्या पांडे आणि आणखी काही स्टारकिडही या क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आता कलाविश्वात एक नवी पिढी येत आहेत. विशेष म्हणजे सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्यामुळे आमच्या साऱ्यांच्या चित्रपटांच्या कथाही एकमेकांपासून प्रचंड भिन्न आहेत”, असं आलिया म्हणाली.
आलियाने तिच्या भूमिकेविषयी म्हणते, “माझ्या वाट्याला आलेली भूमिका ही अगदी माझ्या खऱ्या आयुष्यासारखी आहे. त्यामुळे मला ही भूमिका साकारत असताना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. या चित्रपटात सैफ अली खान यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे”.
दरम्यान, आलियाच्या या चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. आलियापूर्वी सारा अली खानच सैफच्या मुलीची भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अखेरीस आलियाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.