समस्याप्रधान सामाजिक चित्रपटांची परंपरा मराठी चित्रपटाला आहे. चित्रपटाद्वारे समस्यांची उकलही करून दाखविली जाते. ‘रमाई’ या रमाबाई आंबेडकरांवरील चित्रपटानंतर निर्माता-दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी ‘आम्ही चमकते तारे’ या चित्रपटाद्वारे समाजात दुर्लक्षित असलेल्या, जन्मत: एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांच्या समस्येला हात घातला आहे. अडचणींवर मात करून हा मुलगा आयुष्यात यशस्वी कसा ठरतो अशा सकारात्मक दृष्टिकोनातून चित्रपटाची हाताळणी केली आहे.
लहान मुलांच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती फिरणारे अनेक चित्रपट मराठीमध्ये अलीकडच्या काळात झळकत आहेत. लहान मुलांची मानसिकता, त्यांचे संवेदनशील मन, गरीब घरातल्या मुलांच्या जिद्दीची कहाणी यांसारखे अनेक विषय हाताळले जात आहेत. आता लहान मुलांवरचा अतिशय वेगळा मराठी चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. एचआयव्ही बाधित मुलगा हा या चित्रपटाचा नायक आहे. जन्मत:च एचआयव्हीची लागण झालेल्या या मुलाला उत्तम गायक बनायचे आहे.
यासंदर्भात प्रकाश जाधव म्हणाले की, दोन-तीन वर्षांपूर्वी फलटण येथे घडलेल्या सत्य घटनेवर वृत्तपत्रातून लेख वाचला होता. चित्रपटातून निश्चित असा संदेश द्यायचा या उद्देशाने ‘आम्ही चमकते तारे’ करण्याचे ठरविले. एचआयव्ही पॉझिटिव्ह ही एड्स आजाराची शेवटची अवस्था असते. हे खरे असले तरी मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांवर औषधोपचार आयुष्यभर घेत राहणे व नियंत्रण ठेवणे सहजशक्य असते. त्याचप्रमाणे एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींनाही औषधोपचार घेऊन प्रदीर्घ काळ आयुष्य जगता येते हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. एचआयव्ही बाधित मुलगा नायक असला तरी चित्रपटामध्ये शाळेत शिकत असलेला हा मुलगा काय काय गमतीजमती करतो ते दाखवून केवळ समस्या न दाखविता विनोदी अंगाने चित्रपट करून तो हृदयस्पर्शी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रकाश जाधव यांनी सांगितले.
‘श्वास’ या गाजलेल्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेले दीपक चौधरी हेही या चित्रपटाचे निर्माते असून ते म्हणाले की, एचआयव्ही बाधित मुलांचा जगण्याचा हक्क, त्यांना समाजाकडून होणारा त्रास या गोष्टी दाखविण्यात आल्या असून चित्रपट १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
इंद्रजित मोरे या बालकलावंताने प्रमुख भूमिका साकारली असून प्रसाद ओक, भरत जाधव, निशा परूळेकर, अरूण नलावडे, सचिन पिळगावकर आदींच्या भूमिका आहेत.
एचआयव्हीबाधित मुलांवरचा ‘आम्ही चमकते तारे’
समस्याप्रधान सामाजिक चित्रपटांची परंपरा मराठी चित्रपटाला आहे. चित्रपटाद्वारे समस्यांची उकलही करून दाखविली जाते. ‘रमाई’ या रमाबाई आंबेडकरांवरील चित्रपटानंतर निर्माता-दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी ‘आम्ही चमकते तारे’ या चित्रपटाद्वारे समाजात दुर्लक्षित असलेल्या, जन्मत: एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांच्या समस्येला हात घातला आहे.
आणखी वाचा
First published on: 23-11-2012 at 10:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamhi chamakte tare is on hiv positive childrens