|| मितेश जोशी
‘झी युवा’ या वहिनीने तरुणाईच्या मनोवृत्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. ‘देवाशपथ’ या मालिकेतून मांडलेला आस्तिक-नास्तिकांचा मनोरंजक विषय असो, ‘फुलपाखरू’ मालिकेतली मानस-वैदेहीची नाजूक प्रेमाची गोष्ट असो किंवा ‘बापमाणूस’ मालिकेतून हाताळलेला बापलेकाचा विषय असो. या सर्व मालिका सध्या यशस्वी ठरल्या आहेत. गेल्या सोमवारपासून ‘झी युवा’ वाहिनीने दोन बहिणींची कथा रंगवणारी ‘आम्ही दोघी’ ही नवीन मालिका आणली आहे.
या मालिकेची कथा मीरा आणि मधुरा या सख्ख्या बहिणींच्या नात्याभोवती फिरणारी आहे. लहानपणीच आई-वडिलांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलून जगाचा निरोप घेतला, तेव्हापासून या दोघी बहिणी मामाकडे लहानाच्या मोठय़ा झाल्या. मालिकेतील मधुरा ही व्यवसायाने इंटेरियर डिझाईनर आहे, तर मीरा ही शाळेत शिक्षिका आहे. एकमेकींच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरणाऱ्या या दोघी घरातील काम आवरून एकत्र कामाला जातात व एकत्रच कामावरून घरी येतात. स्वभावाने मीरा अगदी मोठय़ा बहिणीसारखी वागणारी आहे. शांत व समजूतदार अशा छटा तिच्या व्यक्तिरेखेला आहेत, तर मधुरा अल्लड,मस्तीखोर आहे. एकमेकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या दोन बहिणींच्या आयुष्यात अचानक एक मुलगा प्रवेश करतो. त्यानंतरची गोष्ट मालिकेतच पाहायला हवी.
‘झी युवा’ वाहिनीवरच्याच ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत राघवची व्यक्तिरेखा रंगवून तरुणींच्या मनावर राज्य करणारा विवेक सांगळे ‘आम्ही दोघी’ या मालिकेत आदित्यची व्यक्तिरेखा साकारतो आहे. आदित्य हा मीरा-मधुराच्या मामाच्या मित्राचा मुलगा आहे. इंजिनीयर असलेला आदित्य मुंबईत नोकरीच्या निमित्ताने येतो आणि इथलाच होऊ न जातो. ‘आम्ही दोघी’ ही मालिका दोन बहिणींच्या जीवनभोवती फिरणारी आहे, अशा वेळी तुझ्या भूमिकेला मालिकेत कितपत वाव मिळेल? असा प्रश्न विवेकला विचारला असता विवेक म्हणाला, ‘ही मालिका जरी दोन बहिणींचं नातं व त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीवर आधारित असली तरी ही कथा त्यांतील इतर व्यक्तींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मालिकेत माझी भूमिका यादृष्टीने मला महत्त्वाची वाटते’.
मालिकेत मीरा, मधुरा व आदित्य या तिघांचा फ्रेश लूक दाखवण्यासाठी पिवळा, पांढरा, लाल, निळा या रंगाच्या गडद छटा वापरून त्यांचे ड्रेस तयार करण्यात आले आहेत. पारंपरिक व आधुनिक असा दोन्हीचा टच आपल्याला त्यांच्या कपडय़ांमध्ये व दागिन्यांमध्ये पाहायला मिळेल. मालिकेत मीराच्या भूमिकेत खुशबू तावडे तर मधुराच्या भूमिकेत शिवानी रांगोळे आहे. याशिवाय सतीश पुळेकर, वर्षां दांदळे, विजय निकम, आशुतोष गायकवाड यांसारखे हरहुन्नरी कलाकार पाहायला मिळणार आहेत. मालिकेचे निर्माते विद्याधर पाठारे असून, कथा रोहिणी निनावे यांची आहे, तर मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा उमेश नामजोशी यांनी सांभाळली आहे.
मुलींची कथा
‘आम्ही दोघी’ ही आजच्या मुलींची कथा आहे. ही मालिका पाहात असताना प्रेक्षकांना आम्ही दोघी बहिणी चांगल्या मैत्रिणींच्या रूपातदेखील दिसणार आहोत. आता मालिकेत मला ‘पाहायचा’ कार्यक्रम सुरू होईल. तेव्हा मला अनेक कारणांनी समोरून नकार येतो. आई-बाबांच्या आत्महत्येचं कारण आहेच, परंतु मुलीचं मांसाहारी असणं, मुलीला कुटुंब नसणं हीदेखील कारणं आहेत. आजच्या युगातही मुलींना अशी कारणं देऊ न नाकारलं जातं हे दुर्दैवी वास्तव या मालिकेतून आम्ही दाखवतो आहोत. हेच या मालिकेचं वेगळेपण आहे म्हणून मी ही मालिका स्वीकारली. – खुशबू तावडे, अभिनेत्री