‘छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे, चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे…’ या गाण्याच्या ओळी आठवल्या तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो कार्यक्रम म्हणजे आम्ही सारे खवय्ये. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर विदेशातही या कार्यक्रमाचा चाहता वर्ग आहे. या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या घटस्थापनेपासून आम्ही सारे खवय्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल २ वर्षानंतर पुन्हा एकदा हा कार्यक्रम नव्या रुपात प्रसारित केला जाणार आहे.
माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो, असे अनेकदा म्हटले जाते. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न घराघरातील गृहिणी करत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ नित्यनियमाने करत होता. पण आता जवळपास २ वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये सुरु होणार आहे. येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
आणखी वाचा : राणादाची लगीन घाई, हार्दिक जोशीच्या केळवणाचे फोटो समोर, ‘या’ व्यक्तीच्या घरातून केली सुरुवात
आम्ही सारे खवय्ये या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे या सांभाळणार आहेत. कोल्हापूरपासून या पर्वाची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील गावागावात आणि शहरातील सोसायटीमध्ये आम्ही सारे खवय्ये रंगणार आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी असे या नवीन पर्वाचे नाव आहे. या पर्वाची खासियत म्हणजे इथे सासू सून, आई मुलगा, नवरा बायको पाककृती जोडीने बनवणार आहेत. तसेच कलाकारांच्या जोड्या ही प्रेक्षकांचं मनोरंजन करतील.
या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे. परत एकदा मला गृहिणींच्या घरी जाऊन त्यांनी बनवलेल्या पाककृतींची चव चाखता येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ हा कार्यक्रम येत्या २६ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता सुरु असणार आहे.