खऱ्या आयुष्यात पती-पत्नी जोडपे पडद्यावरही एकत्र नायक-नायिका म्हणून एकत्र येणार असतील तर त्याविषयी प्रेक्षक तसेच सिनेमासृष्टीलाही प्रचंड कुतूहल निर्माण होते. अभिषेक-ऐश्वर्या यांनी धूम २ आणि गुरू या चित्रपटांमध्ये नायक-नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या. शाहीद आणि करिना यांचे प्रेम जुळले होते तेव्हा त्यांनी ‘जब वुई मेट’, ‘फिदा’ हे चित्रपट केले होते. आता प्रथमच पडद्यावर सुपरस्टार आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याची पत्नी आणि दिग्दर्शिका किरण रावसोबत पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा आहे. किरण रावनेच प्रमुख भूमिका साकारावी, अशी खुद्द आमिर खानचीच इच्छा आहे.
आमिरला आता वयाच्या आणि करिअरच्या या टप्प्यावर एक परिपक्व रोमॅण्टिक भूमिका साकारायची आहे. अलीकडेच त्याने एक पटकथा वाचली आणि ती वाचत असताना नायिकेची भूमिका किरण रावनेच करावी, असे मत त्याने व्यक्त केले. ‘लगान’साठी किरण राव सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत असतानाही अभिनय करण्याबद्दल आमिर खानसोबत तिच्या चर्चा झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर ‘धोबी घाट’मधून किरण रावने दिग्दर्शकीय पदार्पण केले तेव्हा आमिर खानने त्या चित्रपटातील यास्मिन ही व्यक्तिरेखा तिनेच साकारावी अशी इच्छा व्यक्त केली होती.
किरण रावची अभिनयाची समज चांगली आहे याची जाणीव आमिर खानला ‘लगान’पासूनच होती. म्हणूनच आता समोर आलेल्या पटकथेतील प्रमुख भूमिका आपण आणि किरण यांनी कराव्यात यासाठी आमिर खान आग्रह धरतोय. अर्थात अद्याप किरण रावने अभिनेत्री म्हणून पडद्यावर येण्याचे ठरविले आहे की नाही याबाबत निश्चितपणे काहीही समजलेले नाही. हे जोडपे पडद्यावर नायक-नायिकेच्या भूमिकेत झळकले तर अलीकडच्या काळात बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोडी ठरू शकेल.

Story img Loader