सहसा कधीही कुणाशीही वाद घालण्याच्या फंदात न पडणारा कलाकार अशी आमिर खानची ख्याती आहे. भले शाहरुख आणि सलमानमध्ये भांडण असेल पण, या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करणारा आमिर खान होता. मी आणि माझे काम यापलीकडे कधी न जाणाऱ्या आमिरने संजय दत्तबद्दल केलेले सहज विधान या दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटवणारे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत संजय दत्तचे सहकलाकारच त्याच्यावर तोंडसुख घेत असल्याचे वृत्त पसरले होते. हा सहकलाकार कोण?, याबद्दल संजयने आत्तापर्यंत थांगपत्ता लागू दिला नव्हता. पण, हा कलाकार म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून आमिर खानच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चित्रपट कारकिर्दीची पंचविशी साजरी करण्यासाठी प्रसिध्दीमाध्यमांना बोलावणाऱ्या आमिरने याच गप्पांमध्ये संजयवरून आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पीकेचे चित्रिकरण आणि संजयचा या चित्रपटातील भाग कधीच चित्रित झाला आहे. त्यामुळे संजयने घरी बसून हा वेळ फुकट घालवण्यापेक्षा बाकीचे चित्रपट पूर्ण करण्यासाठी दिला पाहिजे, असे आमिरने सांगितले. आमिरने असे विधान का केले? तो असे जाणूनबुजून करणारा कलाकार नाही. शिवाय, त्याचे आणि आपले चांगले संबंध आहेत असे असतानाही त्याने असे बेजबाबदार विधान का केले?, असे प्रश्न संजयला पडले. ‘पीके’, ‘उंगली’ या चित्रपटांचे चित्रिकरण, डबिंग याच कामात आपण गुंतलो आहोत. जास्तीत जास्त चित्रपट पूर्ण झाले नाहीत तर आपलेच आर्थिक नुकसान होणार आहे. तरीही आमिरसारख्या मित्राने केलेले हे विधान संजयच्या जिव्हारी लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले. अर्थात, संजयने आमिरला फोनवरून असे का केले?, याचा जाबही विचारल्याचे कळते. मात्र, आमिरकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

Story img Loader