बॉलिवूडमध्ये आलेल्या ‘मी टु’ सारख्या क्रांतीकारक चळवळीनं अनेकांचे खरे चेहरे उघड झाले. या मोहिमेमुळे बॉलिवूडमधल्या अनेक बड्या दिग्दर्शकावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप झाले. यात ‘मोगुल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांचाही समावेश होता. २०१४ मध्ये गितीका त्यागी या अभिनेत्रीनं सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता हे प्रकरण पुढे न्यायालयात देखील गेलं. आमिरला ही बाब समजल्यानंतर त्यांनं पत्नीसह दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘मोगुल’ च्या निर्मितीवर टांगती तलवार होती.
पण आता आमिरनं माघार घेतली आहे. ‘द क्विंट’च्या माहितीनुसार सुभाष कपूर यांच्या गच्छंतीनंतर आमिरनं चित्रपट पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे. टी- सीरिजचे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘मोगुल’ हा चित्रपट आहे. ‘मोगुल’च्या दिग्दर्शनाच्या जबाबदारीतून सुभाष कपूर यांची हाकलपट्टी झाल्यानंतर आता टी सिरीज नव्या दिग्दर्शकाच्या शोधात आहे. नव्या दिग्दर्शकासोबतच काही नव्या कलाकारांचाही शोध घेतला जात आहे.
आमिर काय म्हणला होता
‘आम्ही ज्या व्यक्तीसोबत चित्रपट करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असं आम्हाला समजलं. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचं ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मिळाली. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आम्ही नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला आहे, सामाजिक समस्यांचं निराकरण करण्यात आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोट्या आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो’, असं आमिर खान आणि किरण राव यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं होतं. त्यानंतर मोगुलमधून आपण बाहेर पडत असल्याचं आमिरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं.
सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत आणि आमिर खान अशाच व्यक्तीसोबत काम करत आहे ही बाब गितीका त्यागीनं किरण रावच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर आमिरनं चित्रपट न करण्याचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. पण, आता आमिर या बहुप्रतिक्षीत चित्रपटात परतला आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.