‘पीके’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर, अभिनेता आमिर खानला लोकांच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीप्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले. क्षुल्लक प्रसिद्धीसाठी आमिरने पोस्टरवर नग्न अवतारात येण्याचा मार्ग निवडल्याची टीका अनेकांकडून केली जात होती. मात्र, या पोस्टरच्या माध्यमातून निव्वळ प्रसिद्धी साधण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे आमिरने स्पष्ट केले आहे. ‘पीके’ या चित्रपटाचा मुळ गाभा या पोस्टरमध्ये दडला असून, चित्रपटाच्या दृष्टीकोनातून या पोस्टरमध्ये साकारण्यात आलेली कलाकृती महत्वाची आहे.  प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितल्यानंतरच त्यांना या पोस्टरमागील खरी संकल्पना लक्षात येईल. राजकुमार हिरानींची चित्रपट निर्मिती आणि लिखाणाची पद्धत बघता, त्यांना मनात आलेल्या संकल्पना अनोख्या पद्धतीने सादर करायला आवडतात. हिरांनीच्या या गुणाचा तो प्रचंड चाहता असल्याचेसुद्धा आमिरने यावेळी सांगितले. त्यामुळे आमिरच्या त्या पोस्टरमागील खरा विचार कळण्यासाठी प्रेक्षकांना ‘पीके’ प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागणार हे मात्र खरे.

Story img Loader