अभिनेता आमिर खान जेव्हा जुलै २०२१ मध्ये त्याच्या घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला होता. लग्नाच्या १५ वर्षांनंतर आमिर खान आणि किरण राव वेगळे झाले. या दोघांमध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला असा प्रश्न त्यावेळी अनेकांना पडला होता. पण आता मात्र घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं यावर मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत त्यानं किरण रावसोबत घटस्फोट होण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला त्यानंतर बऱ्याच अफवा पसरल्या होत्या. तसेच आमिर खानला ट्रोलही करण्यात आलं होतं. वाद देखील झाले. पण यावर आमिर आणि किरण यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता मात्र यावर आमिरनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

आमिर खाननं ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच्या घटस्फोटावर भाष्य केलं. किरण रावला घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावर तो म्हणाला, ‘ती मला नेहमी म्हणायची की जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून कोणत्या विषयावर बोलत असू तेव्हाही मी माझ्याच विश्वात रमलेला असे. मी एक वेगळा व्यक्ती आहे. त्यानंतर तिनं मला हे देखील स्पष्ट केलं की मी बदलावं अशी तिची इच्छा अजिबात नाही. कारण मी जर बदललो तर तो व्यक्ती राहणार नाही ज्या व्यक्तीवर तिनं प्रेम केलं होतं. असं तिचं म्हणणं होतं. तिचं माझ्या बुद्धीवर आणि व्यक्तीमत्त्वावर प्रेम होतं त्यामुळे मी कधी स्वतःला बदलावं अशी अपेक्षा तिने कधीच केली नाही.

आणखी वाचा- “पत्नी रिना, किरण राव आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे ही माझी मोठी…”, आमिर खानचा धक्कादायक खुलासा

आमिर पुढे म्हणाला, ‘पण जेव्हा किरणनं मला ७ वर्षांपूर्वी सांगितलेल्या काही गोष्टींवर जेव्हा मी आज विचार करतो तेव्हा मी एक सांगेन की मागच्या ६-७ महिन्यांमध्ये मी स्वतःमध्ये बरेच बदल होताना पाहिले आहेत.’

जेव्हा आमिरला घटस्फोटाच्या कारणाविषयी विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, ‘किरणजी आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा आणि आदर आहे. लोकांना आमच्या बॉन्डिंगबद्दल समजत नसेलही.आम्हाला समजणं कठीण आहे. कारण जेव्हा एक विवाहित जोडपं वेगळं होतं तेव्हा त्यांच्यामध्ये असं बॉन्डिंग पाहायला मिळत नाही जे आज आमच्यात आहे. किरण आणि माझा घटस्फोट होण्याचं कारण दुसरं कोणतंही नातं नव्हतं. आमच्या घटस्फोटानंतर माझं फातिमा सना शेखशी अफेअर असल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. माझं तेव्हाही कोणाशी अफेअर नव्हतं आणि आताही मी कोणत्याही व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये नाही.’

आणखी वाचा- सबा आझाद हृतिकची एक्स वाइफ सुझान खानला ‘या’ खास नावाने मारते हाक!

दरम्यान आमिर खाननं पहिली पत्नी रिना दत्तापासून २००२ साली घटस्फोट घेतला होता. त्यानंतर ३ वर्षांनी २००५ साली त्यानं किरण रावशी लग्न केलं. आमिर आणि किरण यांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २०११ साली या दोघांचा मुलगा आझादचा जन्म झाला. किरण राव आणि आमिर यांनी सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan divorce reason actor talk about why he break marriage with kiran rao after 15 years mrj