मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटामधील भूमिकेसाठी हवी ती मेहनत करायला तयार असतो. म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट बोललं जातं. एका चित्रपटावर अधिक काळ काम करणं ही त्याची खासियत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. जवळपास दोन वर्ष आमिर या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. ४ वर्षानंतर या चित्रपटाच्यानिमित्ताने तो रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणादरम्यान आमिरला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला.
आणखी वाचा – “अजूनही शिकतोय, धडपडतोय पण…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची पोस्ट चर्चेत
‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणादरम्यान आमिरला दुखापत झाली. मात्र त्याने चित्रीकरणामधून ब्रेक घेतला नाही. या चित्रपटामध्ये आमिर साकारत असलेली लाल सिंह चड्ढा ही भूमिका फारच आव्हानात्मक होती. चित्रपटामधील एक सीन असा होता की लाल सिंह चड्ढा काही वर्ष फक्त धावत आहे असं दाखवायचं होतं. या एका सीनसाठी आमिरने खूप मेहनत घेतली. यादरम्यान त्याला गुडघ्याला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला होता.
पण आमिरने पेन किलर खात गुडघ्याला झालेली दुखापत सहन केली आणि चित्रपटाचं चित्रीकरण सुरु ठेवलं. यामागचं कारण म्हणजे करोनामुळे चित्रपटाचं चित्रीकरण रखडलं होतं. पुन्हा चित्रीकरणामध्ये अडथळा न येण्यासाठी आमिरने दुखापत असतानाही चित्रीकरण पूर्ण केलं. आमिरचा हा चित्रपट बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट असणार असल्याचंही बोललं जात आहे.
आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा
येत्या ११ ऑगस्टला ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. त्याचबरोबरीने आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम १८ स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आमिरबरोबरच अभिनेत्री करीना कपूर खान चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल.