बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. आता करीना कपूर खानने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा – आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट
‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “चित्रपट ट्रोल करणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग आहे. हा तोच वर्ग आहे जो तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतो. ट्रोल करणारा वर्ग फक्त १ टक्के आहे. पण प्रत्यक्षात चित्रपटाला मिळणारं प्रेम खूप वेगळं आहे.” करीनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सतत होणाऱ्या ट्रोलिंगबाबत उत्तर दिलं.
‘लाल सिंग चड्ढा’ पाहण्यासाठीही तिने प्रेक्षकांना आवाहन केलं. “कृपा करून या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. प्रत्यक्षात हे एका चांगल्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासारखंच आहे. जवळपास अडीच वर्ष २५० लोकांनी या चित्रपटासाठी काम केलं आहे.” असं करीनाने म्हटलं आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाने पाहावा अशी करीनाची इच्छा आहे. शिवाय चित्रपटाबाबत होणाऱ्या ट्रोलिंगकडे सध्या करीना दुर्लक्ष करत आहे.
याआधीही करीनाने या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली होती. करीना चित्रपटाबद्दल म्हणाली, “जगात सगळ्यांनी ‘फॉरेस्ट गंप’ हा चित्रपट पाहिला नसेल. जे लोक इंग्रजी बोलत नाहीत ते या कथेसाठी नक्की चित्रपट पाहतील. हा चित्रपट तामिळ आणि तेलगूमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या भाषेत चित्रपट पाहता येईल.” आता १५ ऑगस्ट आणि विकेण्डचा चित्रपटाला फायदा होणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.