यशराज बॅनर, ‘धूम’ चित्रपट मालिकांची लोकप्रियता, आमिर आणि कतरिना ही आत्तापर्यंत पडद्यावर न आलेली जोडी अशा सगळ्या बाजू लक्षात घेऊन ‘धूम ३’ कमीतकमी दिवसांमध्ये जास्त कमाई करेल, हा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज खरा ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तिकीटबारीवर जास्तीत जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने चार दिवसांत एकूण २०२.४९ कोटींची कमाई केली आहे. आमिरच्या ‘धूम ३’ ने शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला मागे टाकून सलमानसमोर पुढच्या वर्षीसाठी नवे आव्हान निर्माण केले आहे. ‘धूम ३’ या चित्रपटाचे तिकीट दर वाढवल्यामुळेच कमाईचा आकडाही मोठा दिसतो आहे, अशी ओरड केली गेली होती. प्रत्यक्षात, ‘आयमॅक्स’ तंत्रावर आधारित चित्रपट सोडले तर बाकी सगळीकडे तिकीटाचे दर इतर बिग बजेट चित्रपटांएवढेच होते. पण, पहिल्या दिवसापासून या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. शुक्रवारी सुट्टीचा दिवस नसतानाही चित्रपटाची कमाई ३६ कोटींच्या आसपास होती. आता त्यात नाताळच्या सुटय़ांचीही भर पडल्याने चित्रपटाने सलग पाच दिवस चांगली गर्दी खेचली आहे. ट्रेड विश्लेषक तरन आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांतच धूम ३ ने भारतात १२९.३२ कोटी रुपये, परदेशात ७३.१७ कोटी रुपये असे मिळून २०२.४९ कोटींची कमाई करत नवा विक्रम नोंदवला आहे.

Story img Loader