आमिर खानने चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातून कमबॅक केलं आहे. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल अशी अपेक्षा निर्मात्यांपासून चाहत्यांपर्यंत सर्वांना होती पण तसं झालं नाही. देशभरात या चित्रपटाची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटूनही हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा गाठू शकला नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. एवढेच नाही तर आमिरचा हा चित्रपट परदेशातही कमाल दाखवू शकला नाही. १८० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ने केवळ ३८.०५ कोटींची कमाई केली आहे.
‘लाल सिंग चड्ढा’ने उत्तर अमेरिकेत सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने येथे २२.८२ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. तर कमाईच्या बाबतीत युके दुसऱ्या क्रमांकावर राहिला. युकेमध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ने ६.६४ कोटी रुपयांची कमाई केली आणि ऑस्ट्रेलियामध्ये ६.४१ लाख रुपयांची कमाई केली आहे.
आणखी वाचा- “मला आदित्य चोप्राचा अभिमान आहे..” अनुपम खेर यांनी दिले अनुराग कश्यपच्या टीकेला उत्तर
‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही झाला. हा चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग करेल अशी अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ११.७० कोटींचे कलेक्शन केले होते, त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. पॅन इंडिया स्तरावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने १५ दिवसांत केवळ ५६.८३ कोटी कमावले.
बॉक्स ऑफिसवर नुकसान झाल्यानंतर ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांना ओटीटी डीलमध्येही नुकसान झालं. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की ‘लाल सिंग चड्ढा’च्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससोबत सुमारे १५० कोटींचा करार केला आहे. पण हा चित्रपट फ्लॉप ठरताच हा करारही तुटला. नवीन माहितीनुसार, लाल सिंह चड्ढा यांचे डिजिटल अधिकार आता ५० कोटींना विकले गेले आहेत.