आमीर खानचा अभिनय असलेल्या ‘पीके’ या चित्रपटाचा अधिकृत टिझर चित्रपटकर्त्यांकडून टि्वटरवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘पीके’च्या प्रसिद्धीसाठी ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’ने टि्वटरच्या ऑडिओ कार्डचा वापर केला आहे. यामुळे टि्वटरच्या ऑडिओ कार्ड सुविधेचा वापर करणारी ‘यूटिव्ही मोशन पिक्चर्स’ ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. टि्वटरच्या वापरकर्त्यांना म्युझिक अथवा ऑडिओ ऐकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टि्वटरने ‘साऊंडक्लाऊड’शी भागीदारी केली आहे. टि्वटरने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे त्यांच्या भारतातील वापरकर्त्यांनादेखील ऑडिओ शोधणे आणि ऐकणे सोपे होणार आहे. मोबाईलवर आपले टि्वटर खाते चाळत असतानादेखील वापरकर्ता या सुविधेचा लाभ घेऊ शकतो. सध्या प्राथमिक स्वरूपात असलेली ही सुविधा येणाऱ्या काळात अनेक चित्रपटकर्ते, निर्मितीसंस्था, गायक आणि संगीतकारांना जोडून घेत व्यापक स्वरूप धारण करणार आहे. ‘पीके’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटकर्त्यांकडून अनेक नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यात येत आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ चित्रपटात आमीर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत, बोमन इराणी आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका आहेत.

Story img Loader