अभिनेता संजय दत्त यांच्या वादग्रस्त आयुष्यावर आधारित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित होऊन आज ३ वर्षे पूर्ण झाली. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि अभिजीत जोशी लिखीत ‘संजू’ हा चित्रपट फिल्म इंडस्ट्रीत सगळ्यात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. मुख्य म्हणजे चित्रपटातील इतरही कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. या कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेता परेश रावल यांचं. परेश रावल यांनी ‘संजू’मध्ये संजय दत्तच्या वडिलांची म्हणजेच दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांची भूमिका साकारली आहे. पण, परेश रावल यांच्या आधी या भूमिकेसाठी आमिर खानला ऑफर मिळाली होती.
२९ जून १०८ रोजी राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता आमिर खानने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता. राजकुमार हिरानी आणि आमिर खान यांची घट्ट मैत्री आहे. त्यामुळे राजकुमार हिरानी यांनी ‘संजू’ या चित्रपटासाठी सुरवातीला अभिनेता आमिर खानची निवड केली होती. परंतू आमिर खानने सुनील दत्त यांची भूमिका करण्यासाठी नकार दिला होता. ज्यावेळी आमिरला या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली, त्यावेळी त्याने सुरवातीला तयारी दाखवली होती. परंतू काही दिवसांनतर त्याने आपला निर्णय बदलला.
View this post on Instagram
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सुद्धा एक मुलाखतीत हे स्पष्ट केलं होतं. त्यावेळी राजकुमार हिरानी म्हणाले, “मी ज्यावेळी एक चित्रपटाची स्क्रिप्ट लिहायला बसतो, त्या प्रत्येक चित्रपटात मी आमिर खानला घेण्यासाठी प्रयत्न करतो. ज्यावेळी मी ‘संजू’ चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीत होतो, त्यावेळी आमिरला ती स्क्रिप्ट खूप आवडली होती. पण त्यापूर्वीच त्याने २०१६ साली रिलीज झालेल्या ‘दंगल’ चित्रपटासाठी साईन केलं होतं. हा चित्रपट गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून नंतर आमिरने या भूमिकेसाठी नकार दिला.”
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान हा राजकुमार हिरानी यांचा सगळ्यात आवडता अभिनेता आहे. तसंच आतापर्यंत ‘पीके’ आणि ‘थ्री इडियट्स’ सारख्या ब्लॉकबस्टर प्रोजेक्टमध्ये त्या दोघांनी एकत्र काम केलंय. पण ‘संजू’ चित्रपटासाठी राजकुमार हिरानी यांनी दिलेली ऑफर आमिरला आवडली नव्हती. आमिरला सुनील दत्त यांची नव्हे तर अभिनेता रणबीर कपूर साकारत असलेल्या संजय दत्तची भूमिका करायची इच्छा होती, म्हणून त्याने सुनील दत्त यांची भूमिका साकारण्यासाठी नकार दिला होता, असंही बोललं जातंय.
पण अखेरील आमिर खाननंतर अभिनेते परेश रावल यांना सुनील दत्त यांच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं. या चित्रपटाला आज तीन वर्षे पूर्ण होत असली तरी आजही या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त याचा संघर्ष पाहणं प्रेक्षक पसंत करतात.