जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित ‘सांड की आंख’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू मुख्य भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची बहीण पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून ती महत्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सांड की आंख’ चित्रपटातून आमिर खानची बहीण निखत खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘डीएनए’ने दिलेल्या वृत्तानुसार, शूटर आजीच्या पात्रासह चित्रपटात आणखी काही पात्र देखील आहेत ज्यांना चित्रपटात महत्व देण्यात आलं आहे. त्यापैकीच एक भूमिका आमिर खानची बहीण निखत खान साकारणार आहे. या चित्रपटामध्ये निखत एका महाराणीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. मात्र तिच्या भूमिकेविषयी अद्याप सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही. इतकंच नाही तर संपूर्ण चित्रपटात तिची प्रमुख भूमिका असणार आहे. चित्रपटात तापसी आणि भूमीसह प्रकाश झा आणि विनीत सिंहदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

अभिनयापूर्वी निखतने निर्माती म्हणून काम केलं आहे.९०च्या दशकात ‘तुम मेरे हो’ चित्रपटाची निर्मिती तिने केली होती. यात निखतने आपल्या वडिलांसह सह-निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये ‘हम किसी से कम नही’ चित्रपटासाठी निखतने कॉस्टयूम अस्सिटन्ट म्हणून काम केलं होतं. संतोष हेगडे निखत खानचे पती असून निखतला श्रवण हेगडे आणि सेहर हेगडे अशी मुलं आहेत.

‘सांड की आँख’ या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमारने केली आहे. तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. याआधी त्यांनी ‘मै तेरा हिरो’, ‘एक विलन’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटांची पटकथा लिहिली होती. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan sister nikhat khan to make her debut