काहींच्या कर्तृत्व, सातत्य, लोकप्रियता यांच्या आड त्यांचे वय येत नाही. आमिर खान तसा आहे. आज १४ मार्च रोजी तो वयाची पन्नाशी पूर्ण करीत आहे. पण त्याचा एकूणच उत्साह आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, त्याची नवीन चित्रपटाची निवड व त्याच चित्रपटासाठी स्वतःला गुंतवून घेणे, त्या चित्रपटाच्या यशापयशाबाबत कमालीचे जागरुक असणे हे सगळं पाहता तो वयाने (व अगदी विचारानेही) तिशीच्या आसपासचा वाटतो. त्यासाठी आपण त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देवूयात. पन्नाशी-साठीच्या शुभेच्छा तो तरी आपल्याशा मानेल का?
आमिर खान म्हटलं की, रसिकांच्या एका पिढीला ‘कयामत से कयामत तक’ पटकन आठवणारच. पण कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण १९८८ साली ‘कयामत से कयामत तक’च्या पूर्वप्रसिद्धीची तयारी सुरु झाली तेव्हा आम्ही सिनेपत्रकार आमिरपेक्षा चित्रपटाचा दिग्दर्शक मन्सूर खान याला भेटण्यात विशेष उत्सुक होतो. का माहित आहे? आमिर तेव्हा अगदीच महाविद्यालयीन विद्यार्थी वाटत होता, तो हिंदी चित्रपटाच्या ‘नायकाच्या वाटचाली’त कितपत टिकेल अशी उगचच शंका. शिवाय तो निर्माते ताहिर हुसेनचा पुत्र, त्यामुळे ‘स्टार सन्स’सारखे त्याचे तसे आकर्षण नव्हते. याउलट मन्सूर खान हा मसालेदार/ मनोरंजक अशा ‘कारवाँ’, ‘प्यार का मौसम’, ‘यादो की बारात’ वगैरे चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसेन यांचा सुपुत्र, त्यामुळे त्याला भेटण्यात विशेष रस होता. अर्थात, ‘कयामत से कयामत’ मध्ये झळकला व तात्कालिक युवा पिढीन आमिर व जुही चावला या दोघानाही पसंत केले.
आमिरची वाटचाल तशी सुखद. पण कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात त्याने ‘अफसाना प्यार का’ (नीलमसोबत), ‘लव्ह लव्ह लव्ह’ (जुहीसोबत), असे अगदीच सामान्य चित्रपट का बरे करावेत? रामगोपाल वर्माच्या ‘रंगीला’पासून त्याचा चित्रपट निवडीचा दृष्टिकोन बदलत गेला असे दिसते. तर आशुतोष गोवारीकरच्या ‘बाजी’त भूमिका साकारताना तो परिपक्व होत गेला. त्यानंतरच ‘लगान’पासून निर्माता म्हणून तो उभा राहिला, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या या कलाकृतीने ऑस्करच्या अंतिम फेरीत विदेशी चित्रपटाच्या नामांकनापर्यंत मजल मारली. त्या क्षणापासून आमिरला प्रतिष्ठा प्राप्त झाली. तो अत्यंत परिपक्व व गंभीर असा सिनेमावाला म्हणून ओळखला गेला. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटापासून व दिग्दर्शनात उतरताना ऑप्टीझन या विकारावर कथारचना केली. अशा टप्प्यांमुळे आमिर खानबाबतची विश्वासार्हता वाढीला लागली. तो जे करतो ते परीपूर्णतेचा ध्यास घेवूनच केलेले असते आणि ते एकदा पाहयलाच हवा असा त्याच्याबाबतचा विश्वास वाढीला लागला ही त्याची सर्वात मोठी मिळकत ठरते. हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘हीरो’ अशी प्रगती करतो हे वेगळेपण आहे व ते फार कौतुकाचेही आहे. त्यामुळेच तर ‘छोट्या पडद्या’वर त्याने साकारलेल्या ‘सत्यमेव जयते’कडे सामाजिकदृष्ट्या पाहिले गेले व त्याने त्यातही बाजी मारली. चित्रपटाच्याही पलिकडे जावून आमिर खान या व्यक्तिमत्वाशी स्वतःची ओळख व ताकद आहे, अशा नवीन दृष्टीने त्यावर फोकस टाकायला हवा.
असे असूनही तो इंद्रकुमारचा ‘मन’, केतन मेहताचा ‘मंगल पांडे’ अशा फसलेल्या चित्रपटातून आपली शक्ती खर्च का करतो? ‘लगान’नंतर दशकभर काळात पुन्हा तो आशुतोष गोवारीकरच्याया दिग्दर्शनात का बरे दिसला नाही? ‘धूम ३’चे मसाला मनोरंजन त्याच्या प्रतिष्ठेच्या योग्यतेचे आहे का? राजकुमार हिरानीच्या ‘पीके’च्या पूर्वपसिद्धीची त्याने ट्रान्झीस्टर हाती घेवून नग्न रुपात पोझ का द्यावी असे प्रश्न पडतातचं. तरी तो गुणी आहे. ‘सरफरोश’पासून त्याला प्रसार माध्यमाची ताकतही समजली व तो प्रत्येक चित्रपटच्या वेळी प्रसार माध्यमांशी त्याने गट्टी जमवत गेला. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रसार माध्यम उपयुक्त आहे असे समजतानाच तो ‘मुद्दे व गुद्दे’ यांचीही योग्य निवड करतो, ही त्याचे वय व अनुभव यामधून आलेली परिपक्वता आहे. त्यामुळे त्याची पत्रकार परिषद खूप लांबली अथवा रेंगाळली तर कंटाळा असा येत नाही. तो छान बोलतो. तसेच तो व्यवस्थित ऐकतोदेखिल. आता तर वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर तो उत्तम मार्गदर्शकही ठरावा.
आमिर असा चतुरस्त्र. तरी त्याची जुही चावलासोबतची मैत्री तुटण्याला तोच कारणीभूत ठरण्याचे गॉसिपिंग गाजले. सेटवरच्या थट्टा मस्करीत आपणचं वरचढ ठरावे ही त्याची वृत्ती सगळ्यानाच मान्य कशी होईल बरे? रामगोपाल वर्मा (रंगीला), कुणाल कोहली (फनाह) अशा दिग्दर्शकांच्या कामातही त्याने बराच हस्तक्षेप केल्याचे गाजले. यश व स्थान यासोबत आपल्याला काही अधिकारदेखील येतात अशी त्याची वृत्ती दिसते. अशा काही नकारात्मक चर्चांचा त्याच्या प्रतिमेवर काहीही परिणाम झाला नाही हे महत्त्वाचे. अथवा, त्याने केलेल्या ब-याच सकारात्मक गोष्टींमुळे त्याच्या दोषांना बाजूला सारले तेच तर खूप महत्त्वाचे असते.
आमिर समाजाशी खूपच जोडला गेला आहे, हे विविध घटनांतून सिद्ध होत गेले. म्हणूनच तर तो अन्य खान हिरोंपेक्षा खूप वेगळा व वरचढ. जनसामान्यांची आस्था व शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत, म्हणून तर त्याच्या पन्नाशीनंतरच्या प्रवासाकडे जरा विशेषच लक्ष राहिल…. अभिनंदन!

Story img Loader