भारतातल्या सर्वात मोठ्या म्युझिक कंपनीचे म्हणजेच टी सिरिज या कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या जीवनावर येणाऱ्या चरित्रपटाचं काम तूर्तास थांबवण्यात आलं आहे. टी सीरिजचे सध्याचे मालक भूषण कुमार यांनी याबद्दल खुलासा केल्याचं सांगितलं जात आहे. ‘मोगुल’ हे या चित्रपटाचं नाव ठरलं होतं. ५ वर्षांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारला हा चित्रपट ऑफर केला गेला होता. पण नंतर काही कारणास्तव अक्षय यातून बाहेर पडला आणि मग आमिर खान या चित्रपटात मुख्य भूमिका करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
आमिर आणि भूषण कुमार मिळून या चित्रपटावर काम करत आहेत अशी चर्चा मध्यंतरी चांगलीच रंगली होती. आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’चं काम संपल्यावर तो ‘मोगुल’वर काम सुरू करणार होता. ‘लाल सिंह चड्ढा’ला भारतात अत्यंत वाईट प्रतिसाद मिळाला. आमिरच्या करकीर्दीतला हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. यामुळे आणि इतर काही करणांमुळे या चित्रपटाशी निगडीत काम अनिश्चित काळासाठी थांबवलं असल्याचं सध्या कानावर येत आहे.
संगीत विश्वातलं गुलशन कुमार हे फार मोठं नाव आहे. अभिनयाचं स्वप्नं उराशी बाळगून गुलशन कुमार मुंबईत आले होते. अभिनयात काहीच काम न झाल्याने त्यांनी आपला मोर्चा कॅसेट्सच्या उद्योगाकडे वळवला. त्यावेळी मोठमोठ्या दुकानात विकणाऱ्या कॅसेट गुलशन कुमार यांनी फुटपाथवर विकायला सुरुवात केली होती. त्यावेळी गाण्यांचे हक्क करोडो रुपयांना विकले जात असत. याच हक्कांच्या वादामुळे गुलशन कुमार यांची हत्या झाली होती.
आणखीन वाचा : भारतात सुपरफ्लॉप पण परदेशात ‘लाल सिंग चड्ढा’ची कमाल, चीनमध्येही चित्रपट प्रदर्शित होणार?
टी सीरिजचे संस्थापक भूषण कुमार यांचं आपल्या वडिलांचा खडतर प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवायचं स्वप्नं आहे. या चित्रपटाची कथा पटकथा दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी लिहिली आहे. आता ते ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. १५ मार्च २०१७ मध्ये गुलशन कुमार यांच्यावरील या बायोपिकचं पोस्टरदेखील प्रदर्शित केलं गेलं होतं.