‘तहलका’चे संपादक तरूण तेजपाल याच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाने अवघा देश ढवळून निघाला. तेजपालच्या कृत्याबद्दल अभिनेता आमिर खाननेदेखील नाराजी व्यक्त केली.  आमिर खान म्हणाला, तेजपालकडून अशाप्रकारचे कृत्य होऊ शकते, याचा धक्काच बसला. या प्रकरणामुळे मी खूप निराश झालो. मी तरूणला ओळखतो, ज्या प्रकारचे त्याचे वर्तन समोर येत आहे, त्यामुळे मी अस्वस्थ झालोय. हे सर्व खूप दु:खदायक आहे. त्या मुलीला कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. यावेळी मनाने मी तिच्याबरोबर आहे. या कठीण काळात सर्वांनी तिच्या समर्थनार्थ उभे राहण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आमिर म्हणाला, समाजाने महिलांबाबतच्या आपल्या वर्तनात बदल करवा, त्याचप्रमाणे पोलिस आणि न्यायव्यवस्थेने त्यांचे काम चोख करावे.
बलात्कार आणि लैंगिक अत्याचारासारख्या घटनांमध्ये महिलांचा दोष नसतो. ज्याने हे कृत्य केले तो गुन्हेगार असून, महिलांचा यात काहीही दोष नाही. अशा प्रकारच्या घटनेत समाजाने महिलाबाबतचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.
तिने कोणत्या प्रकारचे कपडे घातले होते, त्या ठिकाणी ती गेलीच कशाला, असे प्रश्न उपस्थित करून महिलांना दोषी न ठरवण्याचा सल्ला त्याने दिला. चित्रपटांना देखील याचा दोष दिला जातो, परंतु निव्वळ मनोरंजन करणे, हे आमचे काम आहे. लोकांचे आणि समाजाचे रक्षण करणे, त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था जपण्याचे खरे काम तर पोलिसांचे आहे. न्यायव्यवस्थेची मुळ जबाबदारी न्याय देण्याची असल्याचे तो म्हणाला.
बलात्कारासारख्या कृत्यामागचे कारण विशद करताना आमिर म्हणाला, माझ्या मते हे एक हिंसक कृत्य आहे. शक्तीच्या जोरावर केलीली जबरदस्ती आहे. असे लोक कशामुळे ही प्रवृत्त होऊ शकतात.
‘सत्यमेव जयते’च्या दुसऱ्या पर्वात समाजातील काही महत्वाच्या आणि गंभीर विषयांना वाचा फोडण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला. ‘शो’विषयी अधिक माहिती देण्यास नकार देत तो म्हणाला, आम्ही विषय जाहीर करणार नाही. अनेक विषयांच्या नोंदीचे काम सुरू आहे. कामाच्या प्रगतीवर आम्ही खूश असून, लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करू.