सध्या आमिर खान चांगलाच चर्चेत आहे. बॉयकॉट ट्रेंडमुळे त्याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चांगलाच आपटला. आमिरच्या कारकीर्दीतला हा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा अशी चर्चा बाहेर होत आहे. खरंतर यावेळेस आमिरचा चित्रपट इतका फ्लॉप होण्यामागचं कारण खुद्द आमिरच आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. याआधी त्याने केलेली वक्तव्यं किंवा पीकेमधून वेगवेगळ्या धर्मांवर केलेली टीका यामुळेच आमिरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. आमिरच्या मनात एखादी गोष्ट येते तेव्हा तो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं इंडस्ट्रीतल्या कित्येक दिग्गजांचं म्हणणं आहे. असाच आमिरचा एक किस्सा आपण जाणून घेऊयात.
दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांचा ओमकारा चित्रपट हा चांगलाच गाजला होता. शेक्सपीअरच्या ‘ओथेल्लो’वर बेतलेल्या या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, करीना कपूर, विवेक ओबेरॉय, बिपाशा बसू, नासिरुद्दीन शाहसारखे कसलेले अभिनेते होते. याच चित्रपटा सैफ अली खान याने साकारलेली ‘लंगडा त्यागी’ ही व्यक्तिरेखा लोकांना प्रचंड आवडली. या व्यक्तिरेखेने सैफच्या कारकिर्दीला एक वेगळीच दिशा मिळाली. ही भूमिका प्रथम आमिरला करायची होती. नेमकी ती सैफकडे कशी गेली आणि यामागे कारण काय होतं?
आणखीन वाचा : ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खान निराश, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
याविषयी मध्यंतरी एका मुलाखतीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीच खुलासा केला आहे. ते म्हणतात की “ओथेल्लोचा आधार घेऊन चित्रपट बनवायची प्रेरणा मला आमिरकडूनच मिळाली. तेव्हा आम्ही बऱ्याचदा याविषयी चर्चा केल्या. काही कारणास्तव आही पुढे त्यावर एकत्र काम करू शकलो नाही. पण त्यावेळेस आमिरने माझ्याकडे ओमकारामधली लंगडा त्यागीची भूमिका करायची इच्छा व्यक्त केली होती.”
पुढे भारद्वाज म्हणतात की “आमिरला एखाद्या भूमिकेबद्दल जेव्हा कुतूहल निर्माण होतं तेव्हा नक्कीच त्या भूमिकेत काहीतरी खास असतं. आणि नेमकी तीच भूमिकेबद्दलची भूक मला सैफच्या नजरेत दिसायची. त्याला त्याच्या ‘टिपिकल लव्हर बॉय’च्या प्रतिमेतून बाहेर पडायचं होतं. म्हणून मी ती भूमिका सैफकडे घेऊन गेलो.” अशारीतीने ओमकारा मधली सर्वात उत्कृष्ट भूमिका सैफच्या पदरात पडली आणि त्याने त्या संधीचं सोनं केलं. प्रेक्षकांनी त्याची भूमिका डोक्यावर घेतली. या भूमिकेसाठी सैफला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.
सैफ सध्या दाक्षिणात्य चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये व्यस्त आहे. ओमकारानंतर सैफने बऱ्याच वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. विक्रम वेधामधली त्याची भूमिकासुद्धा अशीच वेगळी आहे. विक्रम वेधामध्ये सैफबरोबर हृतिक रोशनही दिसणार आहे.