बॉलिवूडचा सुपरस्टार मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुचर्चित ‘दंगल’ चित्रपटाने जगभरात २००० कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले. मात्र, या चित्रपटाने अद्याप २००० कोटींचा आकडा पार केलेलाच नसल्याचे आता समोर आलेय. आतापर्यंत ‘दंगल’ने १८६४ कोटी रुपयांची कमाई केल्याचे कळते. २०१६मध्ये आलेल्या बायोपिकने भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून मान मिळवला आहे. तसेच, चीनमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा मानही आमिरच्या या चित्रपटाला मिळाला आहे.

वाचा : ‘द कपिल शर्मा शो’मधील सुमोना व्यसनाधीन?

अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या ‘दंगल’ने जगभरात २००० कोटी रुपयांची बक्कळ कमाई केल्याचे वृत्त गेल्याच आठवड्यात आले होते. ‘दंगल’च्या प्रवक्त्याने मात्र आता सर्व सत्य समोर आणले आहे. तो म्हणाला की, ‘दंगलने जगभरात २००० कोटींची कमाई केल्याच्या बऱ्याच बातम्या आम्ही वाचतोय. पण हा विक्रम रचणं अजून बाकी आहे. गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार दंगलची जगभरातील एकूण मिळकत १८६४ कोटी इतकी आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल आम्ही खूप खूश आहोत. जगभरातील प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम हे आमिर खान आणि आमच्या टीमसाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे.’

वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती’

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ गेल्या वर्षी २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. भारतीय कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुली गीता, बबिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. स्वतः महावीर यांनीच आपल्या मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना जगविख्यात महिला कुस्तीपटू बनवले होते. आमिर खानने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत साक्षी तन्वर, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, झायरा वसिम, सुहानी भटनागर आणि अपारशक्ती खुराणा यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. यशराज फिल्म्सच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात आमिर आणि फातिमा सना शेखची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. यात बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांचीही प्रमुख भूमिका असून पहिल्यांदाच आमिर त्यांच्यासोबत काम करताना दिसेल. विजय कृष्ण आचार्य या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.