अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान सध्या चर्चेत आहे. स्टारकिड असूनही ती बॉलिवूडच्या प्रकाशझोतापासून लांब राहणे पसंत करते. तिने नाट्यदिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे. ती फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. आयराने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे हा फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. तो सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग देतो. त्याने काही चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. २०२० मध्ये करोना काळात आयरा आणि नुपूर यांनी डेट करायला सुरुवात केली. नुपूर सध्या सुरु असलेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने गुडघ्यावर बसून आयराला प्रपोझ केले. तेव्हा नुपूरच्या या मागणीला तिने हसत होकार दिला. दरम्यान त्यांच्या आजूबाजूला असलेले लोक या तरुण जोडप्यासाठी टाळ्या वाजवत होते. त्यांच्या या गोड क्षणांचा व्हिडीओ आयराने सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने “पोपाय : ती होय म्हणाली. आयरा : हीही मी हो म्हणाले”, असे कॅप्शन लिहिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय फातिमा सना शेख, सारा तेंडुलकर, हुमा कुरेशी अशा सेलिब्रिटींनीही या दोघांचे अभिनंदन केले आहे. तिच्या या व्हिडीओवर आमिरची प्रतिक्रिया अद्याप समोर आली नाही आहे.
आयरा ही आमिर आणि त्यांची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे.